घरपोच लसवाल्यांवर कारवाई हवी

Shailendra Paranjapeजगभराच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याची बातमी आलीय आणि त्याबरोबरच देशातले आणि महाराष्ट्रातलेही रुग्ण कमी होत आहेत, ही आशादायक बातमीही आलीय. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ९० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. मृत्युदर केवळ दीड टक्काच आहे. त्यामुळे १५ मेनंतर कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज राज्याच्या कोरोनाविषयक टास्क फोर्स अर्थात कृती दलाचे तज्ज्ञ करीत होते आणि तो खरा ठरल्याचेच दिसून येत आहे.

कोरोना (Corona) पसरण्याचा ट्रेंड, त्याची कारणे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करताना त्यातल्या कमतरता, प्राणवायू पुरवठा, बेड्सचे नियोजन यासह विविध घटकांचा अभ्यास करून नियोजन केलं जातं. राज्यभरातली माहिती संकलित करून त्या आधारे आणि वैद्यकीय निरीक्षणांच्या आधारे टास्क फोर्सचे तज्ज्ञ राज्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यातल्याच एका तज्ज्ञाने कोरोना विषाणू हा प्रेडिक्टेबली अनप्रेडिक्टेबल असल्याचे कालच नमूद केले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले आणि मृत्युदर आटोक्यात असला तरीही कोरोनासंदर्भातल्या तीन महत्त्वाच्या सूचना एसएमएस अर्थात सँनेटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स यांचा विसर पडू देता कामा नये. नाही तर आपण सतर्क राहिलो की कोरोनाचा फैलाव कमी आणि आपण कोरोनाकडे डोळेझाक करू लागलो की, पुन्हा त्याचा उद्रेक, हे होऊ देता कामा नये.

विज्ञान-तंत्रज्ञानातल्या प्रगतीच्या परिणामस्वरूप तज्ज्ञ मंडळींना त्यांचं काम करायला मदत झालीच आहे; पण संगणक, माहिती-तंत्रज्ञान, मोबाईल या सर्व प्रगतीमुळे तातडीने आणि अल्पावधीत उपयुक्त माहिती लाखो लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवणेही शक्य झाले आहे. त्यामुळेच तज्ज्ञ मंडळी आणि सरकारी यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातले वॉरियर्स हे सारे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतच आहेत, पाडत राहतील; पण सुबुद्ध नागरिक म्हणून आपण त्यांना साथ द्यायला हवीय. रेमडेसिवीरचा काळाबाजार, प्राणवायूमध्ये अफरातफर किंवा राजकीय वजन वापरून पुढाऱ्यांनी लसीकरण केंद्रांवर दादागिरी करणे, हे सारे थांबायला हवे. एखाद्या रुग्णालयातल्या वॉर्डबॉयनेच इंजेक्शनची केलेली चोरी असो किंवा रांगेत तिष्ठत थांबलेल्या सिनिअर सिटीझन्सना लस न मिळता पुढाऱ्यांना घरी जाऊन लस दिली जात असेल तर ते निषेधार्हच आहे.

पुण्याच्या सिंहगड रोड भागात पुढाऱ्याला घरी जाऊन लस देण्याचा प्रकार पुढे आला आहे आणि त्याची सखोल चौकशी करून त्या माननीयांवर कारवाई व्हायलाच हवी. पण या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण केंद्रावरच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला आणि हा प्रकार घडला. विशेष म्हणजे पालिकेच्या वॉर्ड कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या प्रकारावर पांघरूण घालण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी तोंडाला कुलपे लावली.

पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकीकडे सूचना द्यायच्या की लसीकरण केंद्रांपासून राजकारण्यांना दूर ठेवा आणि दुसरीकडे एका पुढाऱ्याने घरी लस मागवून घ्यायची, हा प्रकार पुण्याचा नावलौकिक घालवणाराच आहे. त्यामुळे या माननीयांवर आणि त्यांच्या दडपशाहीला बळी पडलेल्या किंवा त्या माननीयांवर विशेष कृपादृष्टी ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई व्हायला हवी.

तौक्तेचा अंदाज अचूक : अभिनंदन आयएमडी !

एकीकडे तौक्ते वादळ महाराष्ट्रावर घोंघावत असतानाच या वादळामुळे सागरी किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्यानं अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर हानी पोहचली आहे. पण त्यातही आशेचा किरण असा की तौक्ते वादळासंबंधी भारतीय हवामानशास्त्र विभागानं अचूक भाकीत केलं होतं. त्यामुळे अगदी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयापासून ते गुजरात, महाराष्ट्र अशा राज्यांच्या आणि जिल्हापातळीपर्यंत प्रशासकीय नियोजन करणं तुलनेनं सोपं गेलंय. परिणामी हानीही कमी करण्यात यश आलंय. त्यामुळे वर्षानुवर्षे हवामान खात्यानं टीकेचं धनी झाल्यानंतर अचूक अंदाजाबद्दल आयएमडीचं कौतुकही खुल्या दिलानं करायला हवंच.

शैलेंद्र परांजपे

Discalimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button