मौजे चिकणघर घोटाळ्याप्रकरणी दोषींवर लवकरच कारवाई – राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

Latest Maharashtra News

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेअंतर्गत येणाऱ्या मैाजे चिकणघर येथील रहिवासी विभागात समाविष्ट ३१२५ चौ. मी. क्षेत्राचे हस्तांतरणीय विकास हक्क देताना घोटाळा झाल्याचे निष्पन्न आले आहे. याप्रकरणातील दोषींवर चैाकशी अहवाल आल्यानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल, असे नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य अॅड. अनिल परब यांनी याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते.

मौजे चिकणघर येथील अनियमिततेप्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त, तत्कालीन नगर रचनाकार व तत्कालीन कनिष्ठ अभियंता यांची खातेनिहाय चैाकशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुरू केली असून, तत्कालीन सहाय्यक संचालक नगर रचना, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची विभागीय चैाकशी सुरू करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. चैाकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर उचित कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. पाटील पुढे म्हणाले.