धक्कादायक! नागपूर जिल्ह्यात महिला डॉक्टरवर अ‍ॅसिडहल्ला; आरोपी अटकेत

नागपूर :- हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील जळीतकांडाचे प्रकरण ताजे असतानाच, एका नराधमाने नागपूर जिल्ह्यात एका महिला डॉक्टरवर अ‍ॅसिडहल्ला केल्याची घटना आज गुरुवारी घडली. या हल्ल्यात महिला डॉक्टर थोडक्यात बचावल्या असून, इतर दोन महिला जखमी झाल्यात. यावेळी घटनास्थळी हजर नागरिकांनी आरोपीला बदडून काढीत पोलिसांच्या स्वाधीन केले. सावनेर येथे दुपारी १२.३०च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्याच्या आवारात एकच गर्दी केली होती.

नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या या महिला डॉक्टर सर्वेक्षणासाठी सावनेरला आल्या होत्या. त्यावेळी निलेश कन्हेरे हा २२ वर्षांचा युवक त्यांच्याजवळ आला. तुमचा चेहरा खराब करतो, असे म्हणत त्याने त्यांच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. महिला डॉक्टरने चेहरा बाजूला केल्याने अ‍ॅसिडचे थेंब बाजूच्या एका विद्यार्थिनीच्या आणि एका महिलेच्या चेहऱ्यावर पडले. या दोघींनाही गंभीर जखमा झाल्या असून, दोन्ही जखमींना पोलिसांनी नागपूरला रवाना केले आहे.

दरम्यान, हल्ला करण्यामागील आरोपीचा उद्देश अद्याप समजू शकलेला नाही.