कटकट गेट मारहाण प्रकरणात परस्परांवर गुन्हे दाखल

Imtiaz Jalil

औरंगाबाद : निवडणुकीच्या दिवशी कटकट गेट परिसरात एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले. यात एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांना धक्काबुक्की झाली. या प्रकरणी इमरान अब्दुल अजीज २८ रा. कटकट गेट बाबर कॉलनी याच्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलना, अज्ज़ु पहैलवान, सय्यद अख्तर, कदीर मौलाना यांचा भाऊ आणि मुलगा ओसामा यांच्या विरोधात कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ नुसार जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचा जखमी कार्यकर्ता मुर्तजा खान युसुफ खान ३८ रा. लोटा कारंजा यांच्या फिर्यादीवरुन एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने दिलेल्या फिर्यादीत एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दकी आणि एमआयएमच्या काही नगरसेवकांची नावे आहेत.

या प्रकरणी कदीर मौलाना, अज्जु पैहलवान आणि कदीर मौलना यांचा मुलगा ओसामा यांना पोलिसांनी अटक केली असून जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोघे फरार असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहीती तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते यांनी दिली. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून पोलिस नाईक शेख अरशद यांनी देखील फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटकट गेट येथील वातावरण निळल्यानंतर एमआयएमचे काही पदाधिकारी कदीर मौलना यांच्याघराकडे गेल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गटाच्या या वर्तणुकीमुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार समीर साजेद बिल्डर, जप्फर बिल्डर, सलमान हुसैनी, मजर खान आणि अन्य १० ते १२ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोलिसांनी दिली.

राष्ट्रवादीच्या जखमी कार्यकर्त्याचा जवाब नोंदवला या प्रकरणात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मुर्तजा खान युसुफ खान ३८ रा. लोटा कारंजा हे जखमी झाले असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांचाही जिन्सी पोलिसांनी जवाब नोंदवला आहे. जवाबात ज्या लोकांचे मारहाण करणाऱ्यांमध्ये नाव असेल त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल होईल. अशी माहीती पोलिसांनी दिली.