कार्डावरील बनावट व्यवहारांबद्दल खातेदारास बँकेकडून मिळाली भरपाई एचडीएफसी बँकेस ग्राहक आयोगाचा दणका

HDFC Bank

मुंबई : डेबिट कार्ड ‘फोर्ज’ किंवा ‘हॅक’ करून त्यावर कोणा तिर्‍हाईताने केलेल्या बेकायदा व्यवहारास कार्डधारकाची चूक किंवा बेपर्वाई  कारणीभूत आहे हे सिद्ध करू न शकल्यास अशा व्यवहारांमुळे कार्डधारकाचे झालेले नुसकान भरून  देण्याची जबाबदारी पूर्णपणे बँकेवरच असते असा निकाल देत राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (National Consumer Grievence Reddresal Commission) अशा एका कार्डधारकास काही लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश ‘एचडीएफसी’ या सर्वात मोठ्या खासगी बँकेस दिला आहे.

मुळच्या चितळसर, ठाणे (प.) येथील असलेल्या व पतीसोबत अमेरिकेत अमेरिकेत वास्तव्य  करणाºया जेस्ना जोस यांच्या प्रकरणात राष्ट्रीय आयोगाचे पीठासीन सदस्य सी. विश्वनाथ यांनी अलिकडेच हा निकाल दिला. जेस्ना यांनी एचडीएफसी बँकेकडून घेतलेल्या ‘प्री-पेड फॉरेक्स प्लस डेबिट कार्डा’वर १५ ते २० डिसेंबर, २००८ या काळात एकूण ६,११० अमेरिकी डॉलरचे २७ बनावट व्यवहार केले गेले होते. आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जेस्ना यांचे झालेले हे सर्व नुकसान एचडीएफसी बँकेने सन २००९ पासूनच्या १५ टक्के व्याजासह भारतीय रुपयांत भरून द्यायचे आहे. त्यावेळच्या विनिमय दराचा  विचार केला तरी जेस्ना यांना काही  लाख रुपयांची भरपाई मिळेल.

बँकेने स्वत:हून पैसे भरून देण्यास नकार दिल्यावर जेस्ना यांनी त्यांच्या वडिलांना कुलमुखत्यारपत्र देऊन ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात (District Consumer Forum) फिर्याद दाखल केली. त्या जिल्हा मंचाने सन २००९ मध्ये जेस्ना यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर बँकेने आधी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व आता राष्ट्रीय आयोगाकडे अपिले केली. पण या तिन्ही स्तरांवरील न्यायालयांनी जेस्ना यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल बँकेलाच एकमुखाने जबाबदार धरले. बँकेने तेव्हाच ठाणे जिल्हा मंचाचा निकाल मान्य करून पैसे दिले असते तर आता १२ वर्षांचे भरभक्कम व्याज देण्याचा पडलेला भूर्दंड तरी वाचला असता. आर्थिक बाजू बळकट असलेल्या बँकेने दीर्घकाळ लढायला लावूनही जोस कुटुंबाने जिद्द सोडली नाही, हेही प्रशंसनीय आहे.

कार्डावर हे बनावट व्यवहार झाले तेव्हा जेस्ना अमेरिकेत लॉस एजेल्समध्ये होत्या. कार्ड त्यांच्याकडे होते तरी त्यावर हजारो किमी दूर हे व्यवहार केले गेले होते. जेस्ना यांच्याकडून कार्ड गहाळ झाले किंवा त्यांनी ते नीट सांभाळून ठेवले नाही म्हणूनच कोणा तिºहाईतीस हे बनावट व्यवहार करणे शक्य झाले. त्यामुळे पैसे भरून द्याला आम्ही बांधील नाही, असा बँकेचा बचाव होता. परंतु कागदोपत्री समोर आलेल्या तथ्यांनी  हा बचाव लंगडा पडला. वस्तुस्थिती अशी होती की, १५ डिसेंबर, २००८ रोजी पहिले तीन व्यवहार लागोपाठ झाले तेव्हाच बँकेस शंका आली होती. म्हणूच बँकेने जेस्ना यांच्याकडे चौकशी केली. व्यवहार आपण केले नसल्याचे त्यांनी सांगूनही ते कार्ड बँकेने २० डिसेंबरपर्यंत ‘हॉट लिस्ट’ केले नाही. त्यामुळे पुढील आणखी २४ व्यवहार होऊ शकले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER