सायाळ आडवे आल्याने दुचाकीला अपघात; तरुण ठार

Bike Accident

सांगली : वाळवा तालुक्यातील नवेखेड -बोरगाव रस्त्यावर पाखले मळ्यानजीक मोटरसायकलखाली अचानक सायाळ हा प्राणी आल्याने झालेल्या अपघातात संकेत उज्वल चव्हाण (वय 20, रा. नवेखेड ) हा तरुण ठार झाला. नागेश पोपट चव्हाण (वय २०) व प्रणव संपत पाटील (वय २१, दोघे रा. नवेखेड) हे दोघे जखमीं आहेत.

मंगळवारी रात्री उशीरा हा अपघात झाल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांनी दिली. शिवजयंती निमित्त पन्हाळा गडावर शिवज्योत आणण्यासाठी संबधित तरूण जाणार होते. मिरवणुकीसाठी रेठरे कारखाना येथील डॉल्बी ठरवून ते नवेखेड गावी परत येत होते.

पाखले मळ्यानजीक त्यांच्या मोटारसायकलला सायाळ धडकल्याने मोटरसायकल घसरली. यामुळे तिघेजण रस्त्यावर पडले. संकेत याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर कराड व इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .