चुकीच्या रेल्वेगाडीत बसला म्हणून अपघात भरपाई नाकारता येत नाही

  • मृताच्या आईला नागपूर खंडपीठाचा दिलासा

नागपूर: धावत्या रेल्वेगाडीतून खाली पडून मृत्यू पावलेली व्यक्ती चुकीच्या गाडीने प्रवास करत होती एवढ्याच कारणावरून त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना रेल्वेकडून कायद्यानुसार देय असलेली भरपाई (Accident compensation)नाकारता येत नाही, असा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur High Court) दिला आहे.

न्या. अनुजा प्रभूदेसाई यांनी हा निकाल देत, भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवहाडी गावच्या श्रीमती मुन्नीबाई मुन्नालाल चौबे या विधवेला आठ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. आग्नेय मध्य रेल्वेने ही भरपाई दोन महिन्यांत मुन्नीबाईच्या खात्यात जमा करण्याचा आदेश दिला गेला.

मुन्नीबाईचा नुलगा विक्की ही १२ डिसेंबर २०१२ रोजी लो. टिळक टर्मिनस-हावडा ‘जनेश्वरी एक्स्प्रेस’ने नागपूर ते तुमसर रोड असा प्रवास करताना मुंडीकोटा येथे धावत्या गाडीतून खाली पडून मरण पावला होता. रेल्वे प्रवासात ‘अनुचित घटना’ घडून प्रवासी जखमी वा मृत झाल्यास भरर्पा देण्याची रेल्वे कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार मुन्नीबाईने नागपूर येथील रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरणात (RACT) दावा दाखल केला.

रेल्वेने भरपाई देण्यास नकार देताना दोन मुद्दे मांडले होते. एक, प्रवासी धावत्या गाडीतून स्वत:हून खाली पडणे ही ‘अनुचित घटना’ नाही. आणि दोन, विक्कीने जे तिकिट काढले होते ते जनेश्वरी एक्स्प्रेस या गाडीला न चालणारे होते त्यामुळे तो त्या गाडीचा अधिकृत प्रवासी नव्हता. यापैकी दुसरा मुद्दा मान्य करून न्यायाधिकरणाने मुन्नीबाईचा दावा फेटाळला होता.
मुन्नीबाईचे अपील मंजूर करताना न्या. प्रभूदेसाई यांनी म्हटले की, धावत्या गाडीतून प्रवासी खाली पडणे ही ‘अनुचित घटना’च असते हे यापूर्वीही अनेक न्यायालयीन निकालांनी स्पष्ट करण्यत आले आहे. विक्की याने प्रवासाचे रीतसर तिकिट काढले होते, हेही रेल्वे नाकारत नाही. तो चूकून दुसर्‍या गाडीत चढला, यामुळे तो अनधिकृत प्रवासी ठरत नाही व तेवढ्याच कारणावरून रेल्वे भरपाई देण्याची जबाबदारी टाळू शकत नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER