विठ्ठलाच्या वारीत हरविलेल्या वृद्धेला घरी घेऊन येताना अपघात, दोघे जागीच ठार

Accident

सातारा : वारीमध्ये हरविलेल्या वृद्धेला तिच्या घरी घेऊन येत असताना वाटेतच कार आणि कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये वृद्धेसह कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी फलटण तालुक्यातील राजुरी येथे झाला. सुगंधा धोडींबा इंदलकर (वय ६५), कारचालक अनिल बाळकृष्ण गायकवाड (वय ३१, दोघेही रा. मुरूम, ता. फलटण) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या काही दिवसांपूर्वी सुगंधा इंदलकर या वारीमध्ये गेल्या होत्या. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. शनिवारी सायंकाळी त्या पंढरपूरमध्ये असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली. त्यामुळे त्यांना आणण्यासाठी कारचालक अनिल गायकवाड हा पंढरपूरला कार घेऊन गेला होता. मध्यरात्री पंढरपूरहून तो सुगंधा इंदलकर यांच्यासह अन्य चारजणांना घेऊन मुरूम गावी यायला निघाला. राजुरी गावच्या हद्दीत आल्यानंतर समोरून आलेल्या भरधाव कंटेनरने (एमएच सीपी ६५९०) कारला (एमएच १२ बीव्ही ४७९०) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचालक अनिल गायकवाड आणि सुगंधा इंदलकर हे दोघे जागीच ठार झाले तर कारमधील सुरेश जयसींग बोदरे (सपकाळ), भानुदास लक्ष्मण बोदरे, शिवाजी बोदरे, जीवन बोदरे (सर्व रा. मुरूम, ता. फलटण) हे जखमी झाले. त्यांच्यावर फलटण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुगंधा इंदलकर या वारीमध्ये हरविल्या होत्या. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. परंतु, त्या सापडल्याने कुटुंबीयांच्या जीवात जीव आला होता. मात्र, त्यांना परत आणताना त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वारीला जाणे त्या महिलेला चांगलेच भोवले असेच म्हणावे लागेल.

ही बातमी पण वाचा : पाताळ भुवनेश्वर गुहेत आहे सृष्टीच्या निर्मितीपासून अंताची माहिती!