
भंडारा : भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात रात्री शॉट सर्किटमुळे अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये आग लागून झालेल्या अपघातात १० बालकांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत आता एका वृत्तवाहिनीने दिलेल्या नव्या माहितीत म्हटले आहे की, या कक्षात फायर अलार्म नव्हता आणि रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही. आग लागल्यानंतर बचाव कार्यात सर्वांत आधी घटनास्थळी पोहचणारे एम्ब्युलेन्स चालक राजकुमार दहेकर यांनी सांगितले की, आग लागली तिथे फायर अलार्म नव्हता. फायर अलार्म असता तर धूर झाल्यानंतर अलार्म वाजला असता आणि मदत कार्य लवकर सुरू होऊ शकले असते. आग लागली तिथे पाण्याची पाईपलाईनही नव्हती. त्यामुळे बाथरूममधून बादल्यांमधून पाणी आणून आग विझवणे कठीण होते. सात मुलांना वाचवता आले. फायर अलार्म आणि इतर सोई असत्या तर १० बालकांना वाचवता आले असते.
सात दिवसांपासून विजेचा दाब होता अनियमित; बावनकुळे यांचा आरोप या शिशु केअर युनिटच्या वीज प्रवाहात गेल्या सात दिवसांपासून बिघाड होता. विजेचा दाब कमी – जास्त होत होता. त्याकडे लक्ष दिले नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही. मे २०२० पासून तीन वेळा रुग्णालयाने इलेक्ट्रिक ऑडिट करा, यासाठी पत्र दिले होते; मात्र ऑडिट झाले नाही, असा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील रुग्णालयांतील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी मी चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरू ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश दिले आहेत, असे ते म्हणालेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला