भारतासह विदेशातही आयुर्वेद पद्धतीचा, योगशास्त्राचा स्वीकार : मोहन भागवत

Mohan Bhagwat

नागपूर :- देशातील प्रत्येक गोष्ट स्वीकार करण्याची मनोवृत्ती आयुर्वेदाची आहे. तंत्रज्ञानासोबतच लोकांना स्वास्थ्यासंबंधी विविध समस्या उद्भवत आहेत. यावर विविध उपचार करूनही या समस्या दूर होताना दिसत नाही. त्यामुळे भारतासोबतच विदेशातील लोकांनी आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात घेऊन आयुर्वेद पद्धतीचा व योगशास्त्राचा स्वीकार केला आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात साण्डू फार्मास्युटिकल्स ली. तर्फे साण्डू आयुर्वेद गौरव समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आयुर्वेद क्षेत्रात प्रेरणादयी व पथदश्री आयुर्वेदचार्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. साण्डू सुर्शूत पुरस्कार शल्यचिकित्सक तंत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल थायराईड सर्जन डॉ. मदन कापरे यांना सन्मानित करण्यात आले. साण्डू आयुर्वेद गौरव पुरस्कार वैद्य सर्वश्री उपेंद्र दीक्षित, महेंद्र शर्मा, ज्योतीशंकर त्रिपाठी, संतोष नेवपूरकर तसेच डॉ. सुभाष रानडे व शंकर पांडूरंग किंजवडेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक, समीर जमदग्नी, साण्डू कंपनीचे संचालक शशांक सांडू, गोवा विधानसभा अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते गाथा साण्डू औषधांची या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

यावेळी मोहन भागवत म्हणाले, आयुर्वेदाचे काम वाढले. मात्र, नाव मोठे झाले नाही. याला कारणीभूत भारतीय आहेत. आपली संस्कृती विसरून परकीय संस्कृतीचा स्वीकार करायला लागलेत. जर आयुर्वेदाला पूर्वीचा मान सन्मान मिळायला पाहिजे, असे वाटत असेल तर आयुर्वेदाचा स्वीकार करून आयुर्वेदाचा प्रचार जास्तीत जास्त करावा लागेल आणि यासाठी सर्व आयुर्वेद चिकित्सकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुढे भागवत म्हणाले, आपल्या संस्कृतीवर प्रेम करा. आयुर्वेद शरीरासोबत मनाचाही विचार करते आणि शरीर, मन व बुद्धीसाठी आयुर्वेदाची आवश्यकता आहे. तसेच आयुर्वेद बंदशास्त्र नसून, ते सर्वसुलभ औषधीशास्त्र आहे. निसर्गाशी अनुकूल असे हे शास्त्र आहे. हेच आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात घेऊन विश्‍वातील अनेक देशांनी आयुर्वेदाचा स्वीकार केला आहे.असेही मोहन भागवत म्हणाले.