
नवी दिल्ली : देशात ५० लाखांहून अधिक कोरोना योद्ध्यांना लस (Vaccine) देण्याचा विक्रम भारताने अवघ्या २१ दिवसांत केला आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरणाचा वेग बराच समाधानकारक आहे. अमेरिकेला ५ लाख लसीकरणाकरिता २४ दिवसांचा अवधी लागला, तर ब्रिटनमध्ये ४३ आणि इस्रायलमध्ये ४५ दिवसांमध्ये ५० लक्ष लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात आतापर्यंत ५४ लाख १६ हजार ८४९ कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
गेल्या एका दिवसात ११ हजार ७१३ कोरोनाबाधितांची भर पडली, तर ९५ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे १ कोटी ८ लाख १४ हजार ३०४ झाली आहे. यातील १ कोटी ५ लाख १० हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १ लाख ४८ हजार ५९० रुग्णांवर (१.३७ टक्के) उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत १ लक्ष ५४ हजार ९१८ रुग्णांचा (१.४३ टक्के) मृत्यू झाला. शनिवारी देशाचा कोरोनमुक्ती दर ९७.१९ टक्के, तर पॉझिटिव्हिटीचा दर ५.३९ टक्के नोंद झाला. शुक्रवारी दिवसभरात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत २ हजार ८७० ने घट नोंदवण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या एका दिवसात केरळमध्ये ५ हजार ६१०, तसेच महाराष्ट्रात २ हजार ६२८ कोरोनाबाधितांची भर पडली. महाराष्ट्र ४०, केरळ १९, छत्तीसगड ८ आणि तामिळनाडूत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २० कोटी ६ लाख ७२ हजार ५८९ कोरोना तपासण्या केल्या आहेत. यातील ७ लाख ४० हजार ७९४ तपासण्या या शुक्रवारी केल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला