
पुणे : अवघ्या काही दिवसांवर आलेला नाताळ (Christmas) सण आणि नववर्षानिमित्ताने राज्यभरातील चर्चमध्ये नियोजन सुरू झाले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नातेवाईकांना ऑनलाईन शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. कोरोनामुळे सर्व नियम पाळून सण साजरा करण्यात येणार असल्याचे ख्रिश्चन धर्मगुरूंनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चमध्ये रंगरंगोटी, स्वच्छतेसह सॅनिटायझेशन करण्यावर भर दिला जात आहे. नाताळच्या मुख्य दिवशी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत उत्सव साजरा केला जाणार आहे. काही ठिकाणी चर्चच्या आवारातील अन्य सांस्कृतिक हॉलमध्ये एलईडीची सोय करण्यात आली असून, तेथूनही उपासना केली जाणार आहे.
नाताळनिमित्त चर्चमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझेशन आणि थर्मल स्क्रीनिंगची विशेष सोय करण्यात आली आहे. उत्सवादरम्यान ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना, तर १० वर्षांच्या आतील मुलांना चर्चमध्ये प्रवेशबंदी असून, त्यांच्यासाठी दर्शनाची ऑनलाईन व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोनामुळे यावर्षी काही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय चर्चच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याशिवाय ख्रिस्ती बांधवांच्या चॅनलवरून प्रेक्षपित होणाऱ्या प्रार्थना सभेत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ख्रिस्ती धर्म गुरूंनी केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला