राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या नगरसेवक भावाची दादागिरी; कामगारांना मारहाण

Kaptan Malik

मुंबई : महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्याच्या भावाने केलेला सत्तेचा दुरुपयोग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक हे काही कामगारांना मुंबईत बेदम मारहाण करीत असल्याचे या व्हिडीओत दिसते आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक हे नगरसेवक असून, ते काही अज्ञात इसमांना मारहाण करताना या व्हिडिओमध्ये दिसून येतात. कुर्ला परिसरातील हे चित्रीकरण असल्याचे म्हटले जात आहे.

अब्दुल रशीद ऊर्फ कप्तान मलिक हे किमान तीन ते चार कामगारांना धक्का देताना, थप्पड लगावताना आणि धमकावताना या व्हिडीओत दिसत आहेत. रस्त्याच्या बाजूला सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणचे हे चित्रीकरण आहे. पुन्हा या भागात दिसल्यास हातपाय तोडण्याची धमकीही कप्तान मलिक कामगारांना देत असल्याचे या व्हिडीओत दिसून येते. महाराष्ट्राचे अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक हे कुर्ला येथील आमदार आहेत, हे येथे उल्लेखनीय.

सौजन्य : मुंबई तक

दरम्यान, हा व्हिडीओ एक महिना जुना असल्याचे कप्तान मलिक यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ कुणी पसरविला आणि त्यामागे त्यांचा काय उद्देश आहे, याची आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. मी ज्यांना रंगेहात पकडले ते सारे ‘वीजचोर’ होते. अवैधरीत्या वीज मीटर आणि इंटरनेट फायबर लाईन बसविण्याचा ते प्रयत्न करीत होते.

सार्वजनिक मालमत्तेची कोट्यवधींची लूट करण्याचा हा प्रकार होता, असे कप्तान मलिक म्हणाले. आपल्याकडे आवश्यक ते सर्व पुरावे आहेत, असा दावाही यावेळी कप्तान मलिक यांनी केला. आपण जर दादागिरी केली असेल तर, त्या ‘चोरां’नी आपल्याविरुद्ध कुठलीही तक्रार का दाखल केली नाही, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणी कप्तान मलिक यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी लोकांनी केली आहे. प्रभावशाली मंत्र्यांचा भाऊ असल्यामुळे, अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाऊ नये, याकडेही लोकांनी लक्ष वेधले आहे.