अबू आझमी यांची आदित्य ठाकरेंविरोधात थेट मंत्रालयातच घोषणाबाजी

Abu Azmi & Aaditya Thackeray

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या समाजवादी पक्षावर आता आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची नामुष्की ओढवली आहे. बुधवारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात सपाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मानखुर्द येथील एस.एम.एस कंपनी बंद करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले.

यावेळी अबू आझमी म्हणाले की, ठाकरे सरकारला आम्ही समर्थन देऊनही ते आमचं म्हणणं ऐकत नाहीत. आमचा साधा फोनही उचलत नाही. आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) वारंवार फोन केला मात्र ते फोनही घेत नाही. त्यामुळे नाराज होऊन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

यावेळी त्यांनी बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणावरील सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच या प्रकरणात पुरावे गोळा करणारी तपास संस्था सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत आहे.

जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत न्याय मिळेल असं वाटत नाही. मी सीबीआयचा निषेध करतो. सीबीआयला सरकारचं खेळणं बनण्यापासून रोखायचं असेल, देशात कायद्याचं राज्य आणायचं असेल तर सर्व विसरुन सर्व पक्षांनी एक झालं पाहिजे. मोदी आणि शाह यांच्या हातातील भाजपला सत्तेच्या गादीवरुन दूर ढकलावं लागेल. नाही तर हा देश उद्ध्वस्त होईल. जे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्याचं उल्लंघन करत आहेत त्यांना हटवलं पाहिजे. असेही आझमी म्हणाले.

आधी ६ डिसेंबर हा काळा दिवस पाळला जायचा, आता त्यापेक्षा अधिक काळा दिवस भारतात आला आहे. ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्यांच्याविरोधात तपास संस्थांना आज पुरावेच मिळत नाहीत, हे दुर्दैव आहे,अशी उद्विग्न प्रतिक्रिया आझमी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER