भाजपला ३००वर जागा मिळतील- अमित शहा

भाजपला 300 च्यावर जागा मिळतील

नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा जवळ येत असतानाच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ५४३ सदस्यसंख्या असलेल्या लोकसभेत बहुमताचा दावा केला आहे. ते म्हणाले, ‘मी देशभरात फिरत आहे. मला पाचव्या आणि सहाव्या टप्प्यानंतर देशाचा मूड लक्षात आला आहे. सातव्या टप्प्यानंतर तर निश्चितच भाजप ३०० वर जागा जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले.’ शहा दिल्ली येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या रोड-शोच्या दरम्यान झालेल्या हिंसाचाराची विस्तृत माहिती दिली.

ही बातमी पण वाचा : तृणमूलच्या गुंडांकडून तीनदा हल्ला, मात्र सीआरपीएफमुळे वाचलो! – अमित शहा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच जनतेचा मूड ओळखला. त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या आणि अखेर त्यांनी हिंसाचाराचा आश्रय घेतल्याचे शहा म्हणाले. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने स्वबळावर २८२ जागा जिंकल्या होत्या. मागील ३० वर्षांत स्वबळावर लोकसभेत बहुमत प्राप्त करणारा भाजप हा पहिला पक्ष होता. यावेळी एनडीएला ३३६ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या निवडणुकीत भाजपला ३०० च्या जवळपास जागा मिळतील, असे मत काही भाजप नेत्यांनी व्यक्त केले आहे.

तर खुद्द पंतप्रधानांनी भाजपला ३०० वर जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. एकट्या भाजपला ३०० तर एनडीए मिळून ३५० जागा मिळतील, असे सहाव्या टप्प्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच म्हटले होते; परंतु भाजपच्या आघाडीतील घटक पक्ष शिरोमणी अकाल दलाचे राज्यसभा खासदार नरेश गुजराल म्हणाले, भाजपला स्पष्ट बहुमतासाठी काही जागा कमी पडतील.