‘अबकी बार नितीन गडकरी पंतप्रधान’, सर्वेक्षणात पुढचे पंतप्रधान म्हणून गडकरींच्या नावाला पसंती

Nitin Gadkari

मुंबई :- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडक (Nitin Gadkari) यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त लोकसत्ता डॉटकॉम सर्वेक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेने पुढचे पंतप्रधान म्हणून नितीन गडकरींच्या बाजूने कौल दिला आहे. पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी हे सध्या पंतप्रधानपदी असणाऱ्या नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) अधिक उत्तम पर्याय असतील असं मत महाराष्ट्रातील जनतेन सर्वेक्षणात नोंदवलं आहे. लोकसत्ता डॉटकॉमच्या सर्वेक्षणामध्ये साडे अकरा हजारांहून अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं आहे. साडे अकरा हजारांपैकी ५४ टक्क्यांहून अधिक लोकांनी गडकरी हे पंतप्रधान म्हणून मोदींपेक्षा योग्य होईल, असं मत नोंदवलं आहे.

भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी नुकतीच सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. नरेंद्र मोदींनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ३० मे २०१९ रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली त्यास दोन वर्षे पूर्ण होत आहेत. २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्याला आता येत्या रविवारी सात वर्षे पूर्ण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारचं मूल्यमापन जनता कसं करते याचा अंदाज घेणारं एक सर्वेक्षण लोकसत्ता डॉटकॉमने २५ आणि २६ मे रोजी घेतलं. या सर्वेक्षणामध्ये ११,५१४ जणांनी आपलं मत नोंदवलं.

याच सर्वेक्षणामध्ये ‘तुमच्या मते भाजपाचा (BJP) कुठला नेता पंतप्रधान म्हणून सर्वोत्कृष्ट आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर उत्तर देताना ५४.७ टक्के म्हणजेच ११,५१४ जणांपैकी ६ हजार ३०० जणांनी गडकरी हे सर्वोत्तम पर्याय असल्याचं मत नोंदवलं. त्या खालोखाल ३२.३ टक्के वाचकांनी नरेंद्र मोदी तर ०.७ टक्के वाचकांनी अमित शाह (Amit Shah) योग्य ठरतील असं मत व्यक्त केलं. मोदींना ३ हजार ७१९ जणांनी पसंती दिली तर शाह यांना केवळ ७७ जणांनी मत दिलं. आश्चर्याची बाब म्हणजे गडकरी, मोदी, शाह यांच्यापैकी कोणताही नेता योग्य नसल्याचं मत नोंदवणाऱ्यांची संख्या १२.३ टक्के होती. एक हजार ४१८ जणांनी या तिघांपैकी कोणताही भाजपाचा नेता पंतप्रधान म्हणून चांगला नसल्याचं मत नोंदवलं.

याच सर्वेक्षणामध्ये मोदी आणि शाह यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या नरेंद्र मोदी व अमित शाह हे दोघेच सरकार चालवतात व अन्य नेत्यांना फारसं महत्त्वाचं स्थान नाही हा आरोप पटतो का?, या प्रश्नाला उत्तर देताना ६४.६ टक्के वाचकांनी हा आरोप बरोबर असल्याचं मत नोंदवलं आहे. ११,५१४ जणांपैकी ७ हजार ४३३ जणांनी होय मोदी आणि शाह दोघेच सरकार चालवतात आणि अन्य नेत्यांनी फारसं महत्वाचं स्थान नाही असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. या प्रश्नावर नाही मत नोंदवण्याची टक्केवारी ३३ (३ हजार ८०१ मतं) तर तटस्थ म्हणून मत नोंदवणाऱ्यांची संख्या २.४ टक्के (२८० मतं) इतकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button