अभिषेकचा दुसरा सिनेमा ‘द बिग बुल’ही ओटीटीवरच रिलीज होणार

Abhishek Bachchan The Big Bull

पिता अमिताभ बच्चन यांनी कोरोना काळात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर ‘गुलाबो सिताबो’तून प्रवेश केला होता. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिषेक बच्चननेही (Abhishek Bachchan) ‘ब्रीद’ या वेबसीरीजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. त्यानंतर अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘लूडो’ही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याऐवजी ओटीटीवरच रिलीज करण्यात आला आणि आता अभिषेकचा दुसरा सिनेमा ‘द बिग बुल’ (The Big Bull) ही मोठ्या पडद्याऐवजी ओटीटीवरच रिलीज केला जाणार आहे. खरे तर सध्या थिएटर सुरु झाले असून अनेक सिनेमे रिलीज होऊ लागले आहेत पण अभिषेकच्या सिनेमाला प्रेक्षक येणार नाही हे लक्षात आल्यानेच हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय निर्माता अजय देवगणने (Ajay Devgn) घेतल्याचे बॉलिवूडमध्ये म्हटले जाऊ लागले आहे.

अभिनेता अजय देवगण निर्माताही झाला असून त्याने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. अभिषेक बच्चनला घेऊन अजयने १९९२ मध्ये संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या हर्षद मेहताने केलेल्या घोटाळ्यावर आधारित ‘द बिग बुल’ सिनेमाला सुरुवात केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन कुकी गुलाटीने केले असून यात इलियाना डीक्रूज (Ileana D’Cruz) नायिका म्हणून घेण्यात आले होते. खरे तर गेल्या वर्षी हा सिनेमा रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे सगळेच गाडे अडले. लॉकडाऊननंतर अजयने सिनेमा पूर्ण केला पण थिएटर मिळत नसल्याने त्याने ओटीटीवर सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला. खरे तर याच विषयावर हंसल मेहता यांनी ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज प्रतीक गांधीला घेऊन तयार केली होती आणि गेल्या वर्षी ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजही केली होती. ही वेबसीरीज प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यामुळेही सिनेमा रिलीज करण्यास अजय धजावत नव्हता. त्यामुळे अजयने आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करणार असल्याची माहिती सोशल मीडियावर सिनेमाचा व्हीडियो रिलीज करीत दिली आहे. १९ मार्च रोजी सिनेमाचा पहिला ट्रेलर आणि ८ एप्रिल रोजी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER