अखेर अभिषेक बच्चनला तारले ओटीटी प्लॅटफॉर्मने

Maharashtra Today

सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा मुलगा अभिषेक (Abhishek Bachchan) याला माता-पित्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही. खरे तर अभिषेक चांगला अभिनेता आहे पण पित्याच्या भल्यामोठ्या इमेजखाली तो दबला गेला. त्याला म्हणावे तसे सिनेमेही मिळाले नाहीत. ज्या सिनेमात ऑथर पॅक्ड भूमिका होत्या त्या त्याने कमालीच्या ताकदीने साकारल्या. यात ‘गुरु’, ‘युवा’ अशा काही मोजक्या सिनेमांची नावे घेता येतील. कोरोनाने मोठ्या पडद्याला ग्रहण लावल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मचा उदय झाला आणि ओटीटी प्लॅटफॉर्मने सगळ्यांनाच कब्ज्यात घेतले. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक कलाकारांना काम मिळाले. यात बॉबी देओल, सुष्मिता सेन पासून अभिषेक बच्चन यांची नावे घेता येतील. आता स्वतः अभिषेक बच्चननेही ओटीटी प्लॅटफॉर्मनेच तारल्याचे कबूल केले आहे. आपण ‘ओटीटीचे बच्चन’ आहोत असे म्हणायलाही त्याने मागेपुढे पाहिले नाही.

अभिषेक बच्चनने कोरोना काळापूर्वी काही सिनेमे केले होते. पण आता ते मोठ्या पडद्यावर रिलीज होण्याची शक्यता कमी असल्याने छोट्या पडद्यावर रिलीज केले जात आहेत. गेल्या वर्षी अभिषेकची भूमिका असलेला ‘लुडो’ ओटीटीवर रिलीज झाला होता आणि आता लवकरच अजय देवगण (Ajay Devgan) द्वारा निर्मित ‘बिग बुल’ सिनेमा ओटीटीवर येत आहे. शेअर दलाल हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित या सिनेमात अभिषेक बच्चनने हर्षद मेहताची भूमिका साकारली आहे.

‘बिग बुल’पूर्वी अभिषेकच्या ‘ब्रीद’, ‘सन्स ऑफ सॉयल’ या वेबसीरीज ओटीटीवर रिलीज करण्यात आल्या होत्या. ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत बोलताना अभिषेकने सांगितले, ‘डिजिटल ते टीव्ही स्क्रीनमध्ये खूप व्हरायटी प्रेक्षकांना पाहायला मिळते. तुम्ही कथा कशी सांगता हेसुद्धा महत्वपूर्ण असते. ‘बिग बुल’ सिनेमा दिग्दर्शक कुकी गुलाटीने मोठ्या पडद्यासाठी शूट केला होता. पण कोरोनामुळे मोठ्या पडद्यावर सिनेमा रिलीज होऊ शकत नसल्याने छोट्या पडद्यासाठी यात काही बदल करण्यात आले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मची वेगळी गरज असल्याने त्याप्रमाणे या सिनेमात बदल केले आहेत. मला वाटते की आता यापुढील काळ हा डिजिटलचाच असणार आहे. एवढेच नव्हे तर भविष्यात सिनेमासोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मही समांतर जागा निर्माण करेल. एक अभिनेता म्हणून मला जसे काम करण्याची इच्छा होती ती ओटीटीमुळे पूर्ण झाली. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले, पण गेल्या १० वर्षात मी जितका व्यस्त नव्हतो तेवढा गेल्या ६-८ महिन्यात झालो आहे. ओटीटीने एक नवीन रस्ता दाखवला असून मी ओटीटीचा बच्चन झालो आहे असेही अभिषेकने म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button