अभिनयला मिळाली कस्तुरी

‘ती सध्या काय करते’ या सिनेमात प्रेमाचे रंग दाखवणारा अभिनय बेर्डे (Abhinay Berde) हा चांगलाच लोकप्रिय झाला. मराठी सिनेमातील कॉमेडी किंग लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) आणि नव्वदीचं दशक गाजवलेली नायिका प्रिया बेर्डे (Priya Berde) यांचा मुलगा हे लेबल घेऊन जरी अभिनय मनोरंजन क्षेत्रात आला असला तरी सहजसुंदर अभिनय आणि नृत्यावरची पकड या दोन्ही गोष्टी अभिनयला इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी उपयुक्त ठरल्या.

‘ती सध्या काय करते’ आणि ‘ये है आशिकी’ या दोन सिनेमातून अभिनयची सुरुवात तर चांगली झाली; मात्र बऱ्याच दिवसांपासून अभिनय मोठ्या पडद्यापासून लांब होता. आता त्याला अभिनयाची कस्तुरी पुन्हा एकदा सापडली असून ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमातून अभिनय बेर्डे त्याच्या चाहत्यांना भेटणार आहे.

मोठे झाल्यानंतर अभिनयच करायचा हे ज्या मुलाने ठरवून टाकलं तो म्हणजे अभिनय बेर्डे. लक्ष्मीकांत आणि प्रियानं त्याचं नाव अभिनय ठेवलं आणि या नावाला पोराने चांगलाच न्याय दिला. लहानपणीच सिनेमातील कलाकार घरी येत असल्यामुळे अभिनयासाठी या क्षेत्रातील एन्ट्री सोपी होती, असं म्हणणं धाडसाचं ठरेल; कारण तो जेव्हा या क्षेत्रात येण्यासाठी तयार झाला तोपर्यंत त्याचे वडील लक्ष्मीकांत काळाच्या पडद्याआड गेले होते आणि कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी एकट्या प्रिया बेर्डेवर येऊन पडली होती. दोन्ही मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवून ती काम करत होती. अभिनयला सिनेमातच करिअर करायचं हे जेव्हा पक्कं ठरलं तेव्हा त्याच्या अभिनय कौशल्यावरच त्याला काम मिळाले पाहिजे याच्यासाठी त्याचा आग्रह होता.

‘ती सध्या काय करते’ या सिनेमात अभिनयने अभिनयाची जादू दाखवून दिली. सिनेमात काम करण्यासाठी जितकी अॅक्टिंग महत्त्वाची असते तितकंच आज डान्सला ही महत्त्व आहे. सिनेमात काम करण्यापूर्वी अभिनयने ही सगळी कौशल्य शिकून घेतल्यामुळे त्याचा पडद्यावरचा वावर सोपा झाला.

‘ये है आशिकी’मध्ये तो हेमल इंगळेसोबत झळकला तर ‘रंपाट’ या सिनेमात पडद्यावरचा हिरो होण्याचे स्वप्न पाहणं आणि प्रत्यक्ष हिरो या शब्दापर्यंत पोहचणं या दोन टोकांमधला हा प्रवास अभिनयने साकारला.

लवकरच अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे’ हा सिनेमा पडद्यावर झळकणार आहे. त्यासाठी अभिनय चित्रीकरणात व्यस्त आहे. आजपर्यंत तीन सिनेमात अभिनयच्या भूमिका वेगळ्या धाटणीच्या होत्या; पण तरीही त्याला त्याच्या वयाला साजेशा अशा भूमिका होत्या. ‘मन कस्तुरी रे’ हादेखील एक प्रेमपट असून यामध्ये आजच्या पिढीचे प्रेमाविषयीचे वास्तव विचार मांडले जाणार आहेत.

अभिनय सांगतो की, आजपर्यंत सिनेमाच्या पडद्यावर प्रेम ही भावना अनेक अर्थाने अनेकदा मांडण्यात आली आहे. प्रेमाला अनेक रंग आहेत. प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट हा गोड होतो, असं नाही पण प्रेमात येणाऱ्या अनुभवामुळे माणूस खूप काही शिकत असतो. त्याला नात्याची किंमत कळत असते. आपल्या आयुष्यात येणारा माणूस आपल्यासाठी काय आहे, त्याचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे याची जाणीव नेहमीच प्रेम देत असतं. या नव्या सिनेमातही प्रेमाचा एक असाच वेगळा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मी स्वतः वैयक्तिक आयुष्यात प्रेमात पडलो नसलो तरी कॉलेजमध्ये असताना अनेकांचं प्रेम जुळवून देण्यामध्ये मी अग्रेसर असायचो. होस्टेलच्या माझ्या रूममध्ये अनेकांच्या प्रेमाच्या गाठी बांधण्याची चर्चा केली आहे. त्यामुळे या नव्या सिनेमामध्ये प्रेमासाठी वाट्टेल ते ही भावना काय असते हे मी माझ्या चाहत्यांना दाखवून देणार आहे. मलाही या सिनेमाची उत्सुकता आहे. सध्या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण सुरू असून लवकरच हा सिनेमा मी चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER