अभिमन्यूचा भीमपराक्रम, मात्र लगेच पोलीस चौकशीचे आमंत्रण

Abhimamyu Mithun
  • एकाच षटकात पाच बळी
  • सलग चार चेंडूवर चार बळी
  • भारतातील सर्व प्रकारच्या राष्ट्रिय क्रिकेट स्पर्धांमध्ये हॅट्रिक करणारा एकमेव

सूरत :- कर्नाटकचा युवा गोलंदाजअभिमन्यू मिथून यंदा धमाल करतोय. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत शुक्रवारी हरियाणाविरुध्द उपांत्य सामन्यात त्याने एकाच षटकात तब्बल पाच बळी घेतले. लालभाई काँट्रॅक्टर स्टेडियमवरील या सामन्यात सहा चेंडूत पाच बळी घेताना अर्थातच हॅट्रिक त्याच्या नावावर लागली. यासह त्याने देशातील सर्व राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये किमान एक तरी हॅट्रिक आपल्या नावावर लावण्याचा पराक्रम केला.

आपल्या 39 धावात 5 बळींच्या कामगिरीने त्याने कर्नाटकला आठ गडी राखून विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. सामन्याच्या अखेरच्या षटकात त्याने ही पाच बळींची धमाल केली नसती तर कदाचित कर्नाटकला दोनशेच्यावर धावांचे लक्ष्य मिळाले असते. हरियाणाचा डाव 8 बाद 194 वर संपला आणि कर्नाटकने हे लक्ष्य 15 षटकांतच ओलांडले.

मिथूनसाठी या भीमपराक्रमाचा आनंद मात्र थोडाच काळ टिकला.कारण या सामन्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्याला कर्नाटक प्रीमियर लिगमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी चौकशीसाठी बोलावले.

असे मिळवले सहा चेंडूत पाच बळी

या 30 वर्षीय जलद गोलंदाजाने हरियाणाच्या डावातील शेवटचे षटक टाकले. त्यात

पहिला चेडू- हिमांशूला मिडविकेटकडे मयंक अगरवालकडून झेलबाद केले.

दुसरा चेंडू- राहूल टेवाटियाला (32) लाँग लाँग आन सिमारेषेवर करुण नायरकडे झेल देण्यास भाग पाडले.

तिसरा चेंडू- सुमीत कुमारला बाद करुन त्याने हॅट्रिक पूर्ण केली. रोहन कदमने शॉर्ट फाईन लेगच्या जागी त्याचा झेल घेतला.

चौथा चेंडू- हरियाणाचा कर्णधार अमीत मिश्रा हा मिथूनचा सलग चार चेंडूतील चौथा बळी ठरला. कव्हर्सच्या जागी के. गौतमने त्याचा झेल घेतला.

पुढचा चेंडू वाईड ठरला.

पाचव्या चेंडूवर त्याला यश मिळाले नाही आणि एक धाव निघाली.

सहावा चेंडू- सामन्यातील अखेरच्या चेंडूवर त्याने जयंत यादवला यष्टीरक्षक के.एल. राहुलकडून झेलबाद केले.

याप्रकारे त्याचे हे षटक
बळी, बळी, बळी, बळी, वाईड, एक धाव, बळी असे राहिले.

कसे होते मिथुनचे हे षटक ते बघा..

  सर्व प्रकारच्या राष्ट्रीय स्पर्धांत हॅट्रिक

अभिमन्यूच्या नावावर आता रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या तिन्ही स्पर्धांमध्ये हॅट्रिक आहे. याप्रकारे अनुक्रमे प्रथम श्रेणी, लिस्ट ए (वन-डे) आणि टी-20 च्या राष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्रिक करणारा तो एकमेव आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने 2009 मध्ये उत्तर प्रदेशविरुध्द हॅट्रिक केली होती. गेल्याच महिन्यात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने तामिळनाडूविरुध्द बंगळुरुला हॅट्रिक केली होती आणि आता टी-20 स्पर्धेतही त्याने आपल्या नावावर हॅट्रिक केली आहे.

गतीत परिवर्तन आणि योग्य टप्प्याने यश

आपल्या पाच बळींच्या अखेरच्या षटकाबद्दल मिथून म्हणतो, “चेंडूच्या गतीत परिवर्तन आणि फलंदाजांना हालचाल करण्यास जागा न देणे याने ही किमया कैली. आपल्याला हॅट्रिकच्या आपल्या दूर्मिळ विक्रमाची माहिती होतीच आणि नेहमीच संघाच्या कामगिरीत योगदान देण्याचा आनंद असतोच.”

पहिलाच गोलंदाज मात्र नाही!

अभिमन्यू मिथूनने एकाच षटकात पाच बळी घेतले असले तरी असा ‘भीम’ पराक्रम करणारा मात्र तो पहिलाच गोलंदाज नाही. आकडेवारी तज्ज्ञ रजनीश गुप्ता यांच्यामते बांगलादेशातील टी-20 स्पर्धेत 2013 मध्ये अल्- अमीन हुसेन नावाच्या गोलंदाजाने अशी कामगीरी केल्याची नोंद आहे. टी-20 च्या इतर बऱ्याच सामन्यांच्या नोंदी नसल्याने अभिमन्यू मिथून हा एकटाच असा गोलंदाज आहे असे खात्रीने म्हणता येणार नाही असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

पोलीस चौकशीचा फेरा

भारतासाठी चार कसोटी व पाच वन डे सामने खेळलेल्या मिथून यानंतर मात्र केपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. त्याला सेंट्रल क्राईम ब्रँचने याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलेले आहे आणि केपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात चौकशीला सामोरा जाणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरणार आहे. केपीएमध्ये त्याने शिवमोगा लायन्स संघाचे कर्णधारपद भूषविलेले आहे. केपीएलमधील गेल्या मोसमासंदर्भात त्याला काही प्रश्न विचारण्यात येतील असे पोलिसांनी म्हटले,आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक झालेली आहे.