अभिजित करणार सावध

Abhijit Khandkekar

तीन ते साडेचार वर्षे खलनायक गुरूनाथ सुभेदार ही भूमिका वठवून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता अभिजित खांडकेकर (Abhijit Khandkekar) आता नव्या कोणत्या रूपात पडद्यावर दिसणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. यापूर्वी गोड चेहऱ्याचा नायक या भूमिकेतून त्याने छोट्या पडद्यावर आगमन केले ते माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून. त्यानंतर सिनेमातही त्याला गुडबॉयचेच रोल मिळाले. पण अभिनयाचे करिअर ऐन भरात असताना अभिजितने चौकट मोडायची ठरवली आणि अफेअरबाज नवऱ्याची खलनायकी भूमिका स्वीकारत राधिकाला ऑनस्क्रीन त्रास दिला. आता नवीन काय या विचारात असलेल्या अभिजितने नागरिकांना सावध करण्याचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे सावध ऐका अभिजितच्या हाका असे चित्र छोट्या पडदयावर दिसणार आहे. क्रिमिनल…चाहूल गुन्हेगाराची या नव्या शोमधून अभिजित प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सध्या समाजात अनेक गुन्हे घडत आहेत. फसवणूकीला लोक बळी पडत आहेत. अशा गुन्ह्यांची, घटनांची सविस्तर माहिती देणारा हा कार्यक्रम आहे. सध्या विविध भाषेतील चांगले कार्यक्रम इतर भाषंमध्ये भाषांतरीत करण्याचा ट्रेंड आहे. एखादी चांगली कथा केवळ अन्य भाषेत आहे म्हणून ती प्रेक्षकांना पाहता येऊ नये हे योग्य नाही असा विचार करून मनोरंजनक्षेत्रात भाषांतराची देवाणघेवाण होत आहे. याच धर्तीवर हिंदीतील क्राइम पेट्रोल या शोचं मराठीकरण चाहूल गुन्हेगारांची या शोमधून करण्याचा विचार पुढे आला. या शोबद्दल प्रेक्षक जितके आतूर आणि उत्सुक आहेत तितकाच अभिजितही आहे. त्याने सोशलमीडियापेजवर या नव्या शोची उत्सुकता किती आहे हे पोस्ट केले आहे.

अभिजित सांगतो, कलाकार म्हणून मला समाजात घडणाऱ्या किंवा घडू शकणाऱ्या गुन्ह्यांबाबत लोकांना सावध करण्याचे काम मिळणे ही खूप मोठी आणि महत्वाची जबाबदारी आहे. आज जे गुन्हे घडतात त्यातील अनेक गुन्हे नागरीकांच्या बेसावधपणामुळे, किंवा आर्थिक आमिषाला बळी पडल्यामुळे किंवा काही गोष्टीत गाफील राहिल्यानेच होतात. जर नागरीक सतर्क राहिले तर गुन्हेगारांचे प्लॅन यशस्वी होणार नाहीत. शिवाय सध्या ऑनलाइन फसवणुकीचेही प्रकार वाढत आहेत. अशा प्रकरणात आमच्यासारख्या कलाकारांनाही फटका बसलेला आहे. काहीही कारण काढून ओटीपी विचारला जातो आणि तो कुणालाही सांगू नये हे माहिती असूनही लोक अनावधानाने ही गोष्ट करतात आणि गुन्हेगार त्यांचे इप्सित साध्या करतात. याचा अर्थ जर आपण सावध राहिलो तर गुन्हेगारांना आळा बसू शकतो. हेच सांगणारा हा शो आहे. तुमचं एक सावध पाऊल…देईल गुन्हेगाराची चाहूल अशी या शोची टॅगलाइन असून या शोच्या निवेदनामध्ये घटनेचे रूपांतरण आणि शेवटी नागरीकांनी काय दक्षता घेतली पाहिजे हे दाखवण्यात येणार आहे. मला वाटतं की ही संधी माझ्यासाठी समाजात जागृती निर्माण करणारी आहे.

महाराष्ट्राचा सुपरस्टार कोण या रिअॅलिटी स्पर्धेतून मनोरंजनक्षेत्रात आलेल्या अभिजितने आजपर्यंत मालिका, नाटक व सिनेमा या माध्यमात अभिनयाची जादू दाखवली आहे. याशिवाय अभिजितची सूत्रसंचालनावरही चांगली मदार आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी अभिजित रेडीओजॉकी असल्याने उत्स्फूर्तपणे बोलण्याची कला त्याला अवगत आहे. आजपर्यंत अभिजितने अनेक कार्यक्रमांचे तसेच रिअॅलिटी शोचे निवेदनही केले आहे. मालिका, सिनेमा, नाटक यापेक्षा अभिजितला वेगळा अनुभव देणारा हा शो असल्याने त्यालाही खूपच उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button