अभिज्ञाने दिला जोर का धक्का

Abhidnya Bhave

प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांवर जितके प्रेम करतात, त्यांच्या अभिनयाला जितकी मनापासून दाद देतात तितकेच असे काही प्रेक्षक असतात की जे सतत या सेलिब्रिटी कलाकारांना ट्रोल करत असतात; शिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही ढवळाढवळ करत असतात. कलाकारांनाही अनेकदा या गोष्टीचा राग येतो. ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधत असतात, आयुष्यातील नवीन गोष्टी शेअर करत असतात. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांचा रागही व्यक्त होत असतो. सध्या अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने तिच्या मनातील खदखद व्यक्त करत विनाकारण कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणाऱ्या नेटकरी प्रेक्षकांना चांगलंच उत्तर दिलं आहे.

अभिज्ञा भावे हिने तिचा मित्र मेहुल पै याच्यासोबत जानेवारी महिन्यात लग्न केलं. अर्थात मेहुल आणि अभिज्ञा या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी कलाकार हे विवाहबंधनात अडकले. अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनेदेखील तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडला. या विवाहाच्या निमित्ताने तिने तिच्या हळदीपासून ते मेहंदी, संगीत, लग्न आणि त्यानंतरचे वेगवेगळे खास फोटोशूट हे सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं. त्यामुळे अभिज्ञाचा लग्नसोहळा म्हणजे सोशल मीडिया पेजवर तिच्या चाहत्यांसाठी ट्रीटच होती. तिच्या चाहत्यांनी अभिज्ञाचे अभिनंदनही केलं. पण या चाहत्यांच्या गर्दीत काही विचित्र स्वभावाच्या नेटकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच विषयावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

अभिज्ञा सांगते की, जेव्हा माझा आणि मेहुलचा लग्न करण्याचा निर्णय झाला तेव्हा खरे तर आम्ही दोघांनी यावर खूप चर्चा केली होती. अर्थात आमच्या दोघांच्याही आयुष्यातला हा दुसरा विवाह असल्यामुळे आम्ही पुरेसा वेळ घेऊन एकमेकांना जोडीदार म्हणून निवडलं. दुसरे लग्न करण्याचा निर्णय हा आमच्या दोघांचा आहे, पण याच विषयावरून काही जण ट्रोल करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडिया पेजवर मी मेहुल आणि माझे काही फोटो शेअर केले त्यावर कमेंट करत असताना काही चुकीच्या मानसिकतेच्या प्रेक्षकांनी मला असं विचारलं की , मी माझ्या पहिल्या पतीपासून घटस्फोट का घेतला ? हे विचारत असताना त्यांची भाषाही चुकीची आहे. पहिल्या नवऱ्याला का सोडलं ? अशा पद्धतीने त्यांनी विचारणा केली आहे. मला त्यांना सांगायचे आहे की, कुणाच्याही खाजगी आयुष्यात अशा पद्धतीने डोकावण्याचा कुणाला अधिकार नसतो. कुठल्याही व्यक्तीला एकदा जोडलेलं नातं तोडायला आवडत नसतं. पण अशा काही गोष्टी घडतात, अशा काही घटना घडतात की त्यामुळे नाती पुढे नेता येत नाहीत हे समजून घेण्याची जर मानसिकता नसेल तर किमान कुणाला असे प्रश्न विचारू नयेत. दुसरी गोष्ट म्हणजे की, आम्हा सेलिब्रिटी कलाकारांना नेहमीच अशा पद्धतीच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत असतं. सेलिब्रिटी कलाकार जरी असलो तरी आम्हीही ही माणसं आहोत.

आम्हालाही आमचे आयुष्य आहे. आमच्या मालिका तुम्ही टीव्हीवर बघता म्हणून तुम्हाला आमच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा अधिकार आहे असे नाही. आमचे आयुष्य हे तुम्ही टीव्हीवरच्या मालिकेमध्ये पाहात नाही. त्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं, ज्या काही गोष्टी होतात आणि त्यामुळे आम्ही जर काही वेगळे निर्णय घेतले तर त्याचे उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील नाही. कलाकारांच्या मालिका बघणं वेगळं आणि त्यांच्या आयुष्यात डोकावून बघणं वेगळं. त्यामुळे आमच्या भूमिकांवर तुम्ही नक्की प्रेम करा; पण आम्ही घेतलेल्या निर्णयावरून आम्हाला ट्रोल करू नका. हे प्रेक्षकांना कुठे तरी सांगणं गरजेचं होतं आणि म्हणून मी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रेक्षकांना उत्तर दिलं. लगोरी… मैत्री रिटर्न्स या मालिकांतून अभिज्ञा भावे घराघरांत पोहचली. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील तिची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील अभिज्ञा भावे हिने साकारलेली ग्रे शेडची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेत अभिज्ञाने मायरा ही खलनायिका साकारली होती. आजपर्यंत बहुतांशी भूमिका अभिज्ञाने खलनायकाच्या किंवा ग्रे शेड असलेल्या केलेल्या आहेत.

अभिनयासोबत मायराला ड्रेस डिझायनिंगची आवड असून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्यासोबत अभिज्ञाने ‘तेजाज्ञा’ या नावाचा फॅशन ब्रँड सुरू केला आहे, ज्यामधून वेगवेगळ्या पारंपरिक साड्या डिझाईन केल्या जातात. अभिनय आणि फॅशन डिझायनर म्हणून अभिज्ञाचा प्रवास यशस्वीपणे सुरू असतानाच तिचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही. पण याचा अर्थ तिने आपले आयुष्य थांबवले पाहिजे असं नाही. त्यामुळे तिने तिचा मित्र मेहुल याच्यासोबत दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला; पण याच गोष्टीवरून अभिज्ञाला ट्रोलिंगला सामोरे जावं लागलं असलं तरी तिनं ठामपणे उत्तर देत ट्रोलिंग करणाऱ्या नेटकऱ्यांना गप्प केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER