सौ. अभिज्ञा अ‍ॅपल पै

Abhidnya Bhave mehul pai

नावात काय आहे असं म्हणतात. पण नावात बरच काही असतं हेदेखील खरं आहे. आपण आपल्या सहवासातील माणसांना कोणत्या नावाने हाक मारतो यावर त्याच्याशी आपलं काय नातं आहे ते समजत असतं.

मित्रमंडळींच्या कंपूत अशी खास नावं असतात की त्या नावाचे सिक्रेट हे त्यांनाच माहित असतं. प्रेमाच्या दुनियेतही अशी खास नावं असतात ती इतर कुणाला माहित नसतात. या नावाने एकमेकांना बोलवलं जातं हे तर माहितीच असेल पण अशी सिक्रेटवाली नावं फोनमध्ये सेव्ह केली जातात आणि त्यातूनही रोमान्स जपता येतो. अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) हिनेही तिचा नवरा मेहुलला एक खास नाव दिले आहे ज्या नावाने ती त्याला हाक तर मारतेच पण सध्या तिला नवऱ्याचा फोन आला की स्क्रिनवर अ‍ॅपल असं नाव येतं. आता मेहुलचा अ‍ॅपल कसा झाला हेपण अभिज्ञाने सोशलमीडियापेजवर शेअर केलं आहे.

तुला पाहते रे मालिकेतील मायरा, खुलता कळी खुलेना या मालिकेतील मोनिका, रंग माझा वेगळा या मालिकेतील तनुजा अशा खलनायिका साकारूनही चाहत्यांच्या प्रेमाची जिच्यावर बरसात झाली त्या अभिज्ञा भावेचे 7 जानेवारीला तिचा खास मित्र मेहुल पै (Mehul Pai) याच्यासोबत लग्न झाले. अभिज्ञाच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. गेल्या वर्षीच्या जुलैमध्येच तिचे आणि मेहुलचे एकत्र फोटो तिने सोशलमीडियापेजवर शेअर करत ती पुन्हा लग्न करत असल्याचे सांगितले होते. अभिज्ञाने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला असून मेहुलसोबत आता तिने नव्याने वैवाहिक आयुष्याला सुरूवात केली आहे. लग्नानंतर अभिज्ञाने दोघांच्या नावाचे आद्याक्षर असलेले मंगळसूत्र बनवून घेतले त्या मंगळसूत्राचीही खूप चर्चा झाली. आता अभिज्ञा पुन्हा एकदा सोशलमीडियापेजवर चर्चेत आली आहे ती तिने तिच्या फोनमध्ये मेहुलचे नाव अ‍ॅपल असे सेव्ह केल्याने. अभिज्ञा मेहुलला ॲपल का म्हणते हे कोडं काही तिच्या चाहत्यांना सुटेना. अभिज्ञाने मेहुलसोबत एक रोमँटिक फोटो शेअर करत माझा अ‍ॅपल अशी कॅप्शन दिली होती. अभिज्ञानेच त्याचे कारणही सांगितले. अभिज्ञा म्हणाली, एक नातं जेव्हा तुटते आणि पुन्हा आपण नव्याने आयुष्य सुरू करण्याचा विचार करतो तेव्हा तुम्हाला भेटलेली व्यक्ती समजून घेणारी असावी असं वाटत असतं. माझ्या आयुष्यात मी एकदा ठोकर खाल्यावर मेहुल जेव्हा माझ्या आयुष्यात आला तेव्हा मला खूप आनंद झाला. यंदा नव्या वर्षाच्या सुरूवातीला आमचे लग्न झाले आणि मेहुलची बायको म्हणून वावरताना तो किती समजूतदार आहे याची जास्त जाणीव झाली. तो स्वभावाने इतका गोड आहे की मी अगदी त्याला सहजपणे ॲपलची उपमा दिली. खरच तो अ‍ॅपलसारखा आहे. मग काय मी त्याला अ‍ॅपल अशीच हाक मारते. इतकेच नव्हे तर माझ्या फोनमध्ये मेहुलचे नाव अ‍ॅपल या नावाने सेव्ह केले आहे. आता जेव्हा तो फोन करतो तेव्हा स्क्रिनवर मिस्टर अ‍ॅपल असे दिसते. प्रेमातल्या या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद मला या अ‍ॅपल पै याने दिल्या आहेत.

अभिनयासोबत अभिज्ञा साडी डिझायनर आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिच्यासोबत अभिज्ञाचा तेजाज्ञा हा साडी डिझायनिंग फॅशन ब्रँडचा व्यवसाय जोमात सुरू आहे. लगोरी या मालिकेपासून अभिज्ञाचा छोट्या पडद्यावरचा प्रवास सुरू झाला. सूर सपाटा या सिनेमातही ती दिसली होती. सध्या तरी अभिज्ञा लग्नाच्या नव्या नवलाईच्या आयुष्याचा आनंद घेत आहे. सौ. अभिज्ञा अ‍ॅपल पै हे तिचे खास नाव बनले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER