
औरंगाबाद : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभवानंतर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना खोचक टोला लगावला. चंद्रकांत पाटील हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी आता खरंच हिमालयात जाण्याची वेळ आली आहे.
ते नक्कीच हिमालयात जातील, असा टोला सत्तार (Abdul Sattar) यांनी लगावला. औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्तार म्हणाले की, चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची योग्य व्यवस्था करू. इतकेच नव्हे तर मोदीसाहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे राहुल गांधींविषयी तसं बोलले नसतील.
पण तिन्ही पक्षांनी समन्वय टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजपला राज्यात एकहाती सत्ता स्थापन करण्याची संधी असल्याचे वक्तव्य केले होते. यावर अब्दुल सत्तार यांनी टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी दिवसा सत्तास्थापनेची स्वप्नं बघू नयेत. त्यांचं स्वप्न खरं होणार आहे. पण ते ३२ तारखेला आणि ३२ तारीख येणार असेल तर त्यांनी जरूर सरकार स्थापन करावं, अशी खोचक टीका अब्दुल सत्तार यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला