बच्चू कडू, दोन लाखांची कर्जमाफी बुजगावणं वाटत असेल तर सरकारमधून बाहेर पडा !

Abdul Sattar-Bacchu Kadu

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली शेतकऱ्यांची दोन लाखांची कर्जमाफी, बच्चू कडू यांना बुजगावणं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कडू यांना सुनावले आहे. ही कर्जमाफी फक्त बुजगावणं आहे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती.

यानंतर राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा ८० टक्के फायदा होणार आहे. ही कर्जमाफी अंतिम नसून, पहिला टप्पा आहे. शासनाच्या तिजोरीत जसा-जसा पैसा येईल तसे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि कर्जमाफीबद्दल निर्णय घेतले जाणार आहेत.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर पुन्हा सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील पाच लोकांनाही मिळत नाही. द्यायचे नाही तर लोकांना फसवता का? गंडवता का? असा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद येथे दुष्काळी मोर्चात बोलताना – रोज १० शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत राजू शेट्टींनी राज्य सरकारचे धिंडवडे काढले. मुख्यमंत्री व्हायच्या आधी शेतकऱ्यांना, मी तुम्हाला चिंतामुक्त करतो, कर्जमुक्त करतो, सातबारा कोरा करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता गावातील पाच लोकांनाही जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा मिळत नाही! हे सरकार शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

कर्जमाफीच्या हिशेबात बॅंकांचा घोळ; बच्चू कडूंनी दिला अहवाल