अब्दुल सत्तार शब्द पाळणारे नेते, शिवबंधन तोडणार नाहीत – संजय राऊत

Sanjay Raut-Abdul Sattar

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून आज मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता असताना शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी खातेवाटपापूर्वीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ठाकरे सरकारला पहिला धक्का दिला आहे. मात्र त्यांचा राजीनामा आमच्यापर्यंत पोचलाच नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले की, मीसुद्धा सत्तारांच्या राजीनाम्याची बातमी पाहिली. ते नाराज का आहेत ते मला माहीत नाही. त्यांना मंत्री बनवलं आहे. पण त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवं आहे. अब्दुल सत्तार पक्षात आले आहेत, त्यांना शिवसेनेनं स्वीकारलं आहे. त्यांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. मरेपर्यंत शिवबंधन सोडणार नाही, असा शब्द अब्दुल सत्तार यांनी दिला होता. ते शब्द पाळणारे नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले. गाडी सुरू होताना सुरुवातीला छोटे-मोठे धक्के बसत असतात.

खातेवाटपाची ‘तारीख पे तारीख’ देणं बरोबर नाही : संजय राऊत

मात्र एकदा गाडी सुरू झाली की सुसाट सुटते. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. पाच वर्षे पूर्ण करेल. पाच वर्षे भाजप विरोधात बसेल, असा दावाही राऊत यांनी केला. दरम्यान, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हेसुद्धा नाराज असल्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्याबाबत राऊत म्हणाले, दीपक सावंत हे जुने जाणते शिवसैनिक आहेत.

अनेक वर्षे आमदार होते. पाच वर्षे आरोग्यमंत्री होते. त्यांच्या नाराजीचे कारण त्यांनी मला सांगितले. त्यांच्या भावना पक्षप्रमुखांकडे पोहचवेन, असं मी सांगितलं. सध्या पक्षप्रमुख मुख्यमंत्रिपदाच्या कामात खूप व्यस्त आहेत. खातेवाटप का जाहीर होत नाही याबाबत मुख्यमंत्री सांगतील. कोणतंही खातं, छोटं मोठं नसतं, केंद्रात असो वा राज्यात, जनतेची सेवा करायची असते. मंत्रिपदं छोटी-मोठी असं जे समजतात ते देशाचा आणि जनतेचा अपमान करतात, असं म्हणत संजय राऊत यांनी नाराज मंत्र्यांना सबुरीचा सल्ला दिला.