निवडणूकीच्या अपयशाने औरंगाबादेत काँग्रेसच्या नेत्यांचं राजीनामा सत्रास सुरुवात

Abdul

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूकीत काँग्रेसला अपेक्षित विजय न मिळाल्याने काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पक्षाने निवडणुकीत कुठल्याही प्रकारचं सहकार्य दिलं नाही. म्हणून नाराज होऊन अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. प्रचारासाठी पक्षाकडून साहित्य पुरवण्यात आलं नाही, तसंच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी प्रचारसभेसाठी वेळही दिला नाही, असं त्यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात चार नगरपालिका निवडणुकांचे आज निकाल लागले. यामध्ये काँग्रेसला दोन ठिकाणी सत्ता मिळाली आहे. याशिवाय काँग्रसेचे 80 पैकी सर्वाधिक 33 उमेदवारही विजयी झाले आहेत. मात्र तिरीही पक्षाने सहकार्य केलं नसल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केलाय.

काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांना प्रचारसभेसाठी 7 वेळा विनंती केली, तर अशोक चव्हाणांना 4 वेळा विनंती केली. मात्र अशोक चव्हाण यांनी आपण नांदेडच्या प्रचारात व्यस्त असल्याचं कारण दिलं, असंही सत्तार यांनी म्हटलं आहे. शिवाय आपल्यावर कोणी दबाव टाकला तर आमदारकीचा राजीनामा देईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष कल्याण काळे यांनीही राजीनामा दिला आहे. जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांनी एकाच वेळी राजीनामा देणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.