आस्ताद शोधतोय काम

गायक आस्ताद काळे

गेल्याच आठवड्यात सिंगिंग स्टार या रिॲलिटी शोची अंतिम फेरी झाली. या शोचा उपविजेता ठरला अभिनेता आणि गायक आस्ताद काळे (Aastad Kale). शो झाला…निकाल लागला…ट्रॉफी घरातील शो केसमध्ये विसावली. आता पुढे काय हा प्रश्न आस्तादसमोर उभा राहिला. प्रसिद्धीच्या वलयातही जमिनीवर पाय असलेली मोजकी कलाकार मंडळी आहेत. सेलिब्रिटींमध्येही, वास्तव स्वीकारून जगणाऱ्या कलाकारांची नावं जेमतेम आहेत. मला सध्या काम हवंय, अभिनय असो किंवा सूत्रसंचालन. माझ्यासाठी योग्य काम असेल तर मला सांगा, अशी आस्तादची पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे. हातात काम नाही हा प्रश्न सध्या अनेक कलाकारांना सतावत आहे. पण बिनधास्तपणे आपल्यासाठी काम मागत आस्तादने लक्ष वेधून घेतले आहे.

आठ महिन्यांपूर्वी जिथल्या तिथे थांबलेली मनोरंजन इंडस्ट्री तशी पाच महिन्यांनी सुरू झाली असली तरी सगळ्यांना काम मिळालेलं नाही. ज्या गोष्टी मागील पानावरून पुढे सुरू झाल्या आहेत त्यामध्ये असलेल्या कलाकारांच्या हातात काम आहे. पण नव्याने काम मिळण्याची आशा अजून दिसत नाही. आस्तादच्या एका पोस्टने अनेकांच्या मनातील प्रश्नाला शब्द मिळाले आहेत. ‘सरस्वती’ ही मालिका संपूनही आता तीन ते चार वर्षे झाली. त्यानंतर ‘मला काही सांगायचंय’ हे नाटक आस्तादनं केलं. या नाटकात त्याच्यासोबत अभिनेत्री तेजश्री प्रधान होती. लॉकडाऊन काळात नाट्यगृहाचा पडदा पडला तो अजूनही उघडलेला नाही. त्यामुळे या नाटकाचे पुन्हा कधी प्रयोग होतील हे सध्या तरी सांगता येत नाही. नव्याने सुरू झालेल्या मालिकांपैकी काही मालिकांचे कास्टिंग लॉकडाऊनपूर्वीच झाले होते आणि अनलॉकनंतर थेट शूटिंगला सुरुवात झाल्याने सध्या तरी कुठल्याही वाहिनीवर नव्या मालिकेसाठी स्लॉट नाही. आस्तादसाठी एक गोष्ट चांगली झाली की, जुलैमध्ये सिंगिग स्टार या शोची घोषणा झाली आणि त्याला या शोमध्ये गाण्याची संधी मिळाली. मुळात आस्तादने शास्त्रीय गायनाचे धडे वयाच्या चौथ्या वर्षापासून घेतले आहेत. त्याचे सूरही पक्के आहेत. त्यामुळे या शोमध्ये आस्तादने त्याच्या गाण्याने परीक्षकांसह चाहत्यांचीही मनं जिंकली. उपविजेतेपदाचा आनंद आहेच त्याला; पण आता हा शो संपल्यानंतर हातात पैसे मिळवून देणारं काम पाहिजे हा विचार सुरू झाला. त्याच विचारातून आस्तादने थेट सोशल मीडियावर कामाच्या शोधात असल्याची पोस्ट शेअर केली.

पुणेकर आस्ताद नेहमीच्या त्याच्या बिनधास्तपणाबद्दल ओळखला जातो. बिगबॉसच्या पहिल्या सीझनमध्ये आस्तादची वर्णी लागली होती. बिगबॉसच्या घरातही अत्यंत रोखठोक, स्पष्टवक्ता अशी त्याची प्रतिमा होती. आस्ताद त्या वेळचा अनुभव सांगताना म्हणतो, अनेकांना स्पष्ट बोलणं आवडत नाही. म्हणूनच एका टास्कमध्ये घरातील व्हिलन कोण हे कपाळावर फुलीचे चिन्ह करून सांगण्याची वेळ आली तेव्हा बहुतांशी स्पर्धक सहकाऱ्यांनी माझ्या कपाळावर फुल्या मारल्या होत्या. माझ्या रोखठोक बोलण्यामुळे मी अनेकांना चुकीचा वाटतो; अर्थात व्हिलन म्हणजे सतत इतरांचे दोष काढणाऱ्या या अर्थाने माझे नाव टास्कमध्ये ब्लॅकलिस्ट झाले होते. पण मला त्याबद्दल कधीच वाईट वाटत नाही. तोंडावर गोड बोलण्यापेक्षा स्पष्ट बोलणे कधीही चांगले. आस्तादच्या स्वभावाची हीच छटा त्याच्या आजवरच्या भूमिकांमध्येही दिसते. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील त्याची भूमिकाही अशीच रोखठोक होती. तर ‘सरस्वती’ मालिकेतील खानदानी राघव साकारताना आस्तादने तो रुबाब लीलया पेलला होता. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील स्वप्नाली पाटीलसोबत त्याने लग्न केले आहे. खरं तर तो प्राची मते या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण प्राचीचे कॅन्सरने निधन झाले. तिच्या शेवटच्या दिवसांत आस्ताद तिच्यासोबतच होता; त्यामुळे प्राचीच्या जाण्यानंतर आस्ताद खूपच खचला होता. त्या वेळी नाना पाटेकर यांनी त्याला त्या मानसिक अवस्थेतून बाहेर पडायला मदत केली होती. आस्ताद जितका रोखठोक, स्पष्ट आहे तितकाच तो भावुक आणि संवेदनशील आहे.

आता सध्या तरी आस्ताद नव्या कामाच्या, भूमिकेच्या शोधात आहे. त्यासाठी आस्तादने सोशल मीडिया पेजवरून मेसेज दिला आहे. आस्तादच्या या आवाहनाला लवकरच प्रतिसाद मिळो, अशा शुभेच्छा त्याला कमेंटच्या रूपाने आल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : धीर धरा… हे दिवसही जातील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER