‘आरे’ चा लढा यशस्वी; अमित ठाकरेंनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार

Amit Thackeray-Uddhav Thackeray

मुंबई : मेट्रोकारशेड आरे मधून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यासाठी राज पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व राज्य सरकारचे आभार मानले आहे.

सर्वांनी एकत्र येऊन दिलेला लढा यशस्वी होतो. ‘आरे’च्या लढ्याने हेच सिद्ध केलंय. एका अर्थाने हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे, अशी फेसबुक पोस्ट करत ‘आरे’बाबत योग्य निर्णय घेणारे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांचे अमित ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

अमित ठाकरे म्हणाले, “आपल्या भूमिकांवर जे ठाम असतात, त्यासाठी न थकता, न थांबता संघर्ष करण्याची ज्यांची तयारी असते, तेच अखेर विजयी होतात! मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’ जंगलाचा- तिथल्या झाडांचा बळी जाऊ नये, यासाठी सातत्याने ज्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, आंदोलनं केली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला, पण पर्यावरण संवर्धनाचा आपला मुद्दा सोडला नाही, अशा सर्व पर्यावरणप्रेमींना माझा सलाम”. असे अमित ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

मेट्रो प्रकल्पाचे आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कांजूरमार्गच्या जागेसाठी एका नव्या पैशाचाही खर्च होणार नाही. मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारने ही जागा मोफत देऊ केली आहे. तसेच आतापर्यंत आरे परिसरातील कारशेडसाठी झालेले बांधकाम आणि खर्चही वाया जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रत्येक पैशाचा विनियोग राज्य सरकार योग्यप्रकारे करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER