‘आप’ने सरकारी शाळांमध्ये दिले एसी वर्ग, स्विमिंग पूल आणि निकालही चांगला : खासदार संजय सिंह

मुंबई :- सरकारी शाळांमध्ये एसी वर्ग सुरू करणारे दिल्ली सरकार पहिले असून सरकारी शाळांचा निकाल खाजगी शाळांच्या निकालापेक्षा चांगला आहे. हे प्रथमच घडले आहे. केजरीवाल सरकारने शाळांमध्ये स्विमिंग पूल, फूटबॉल मैदान व मोठमोठी मैदाने तयार केली. आम्ही काय केले हे बघायची अमेरिकेच्या फर्स्ट लेडीची इच्छा असल्याचे आपचे नेते खासदार संजय सिंह यांनी आज येथे दिल्ली सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.

मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर राजकीय पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या भाजपासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली असून, दिल्लीत बहुमत मिळवलेल्या ‘आप’नेही निवडणूक लढवणार असल्याची माहिती आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली.

भाजपाने बी टीमला सक्रिय केले; वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून जयंत पाटलांची टीका

संजय सिंह म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळामध्ये करवसुली दुप्पट झाली. ३२ हजार कोटी करवसुली २०१५ मध्ये होती. आता करवसुली ६२ हजार कोटींवर आहे म्हणजेच दुप्पट झाली आहे. या पैशातून श्रीमंतांना आम्ही फायदा दिला नाही, तर गरिबांना मोफत जीवनावश्यक सुविधा दिल्या असल्याचे सिंह म्हणाले.

या वाढलेल्या करामधूनच गरिबांना मोफत सेवा देण्यात आल्या. इतके चांगले काम केजरीवाल सरकारच्या काळात झाले. वीज वितरणाचे नुकसान ४० टक्के होते, जे आता ८ टक्के आहे. ही सगळी चोरी आम्ही थांबवली. त्यानंतर ग्राहकांना २०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली. मोफत पाणी, मोफत वीज, महिलांना मोफत बसप्रवास हे देणे सरकारचेच काम असल्याचे ते म्हणाले.