आमिरच्या मुलाने जुनैदने केला अभिनयाचा श्रीगणेशा, यशराजच्या ‘महाराजा’चे केले शूटिंग सुरु

Aamir son Junaid makes acting debut

बॉलिवूडमध्ये (Bollywood news) वंशवादाची चर्चा गेल्या सहा-आठ महिन्यांपासून सुरु आहे. बॉलिवूडमध्ये यश मिळवलेल्यांच्या मुलांना लगेचच संधी मिळते तर बाहेरून आलेल्या कलाकारांना पहिल्या मोठ्या संधीसाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो. या संघर्षात एखादा गॉडफादर भेटला तर मात्र मोठी संधी लवकर मिळते. पण सगळेच तेवढे नशीबवान नसतात. आमिर खान बॉलिवूडमधील मि. परफेक्शनिस्ट मानला जातो. तो बॉलिवूडमधील यशस्वी फॅमिलीमधूनच आला होता. त्याच्यासाठी त्याच्या काकांनी सिनेमाची निर्मिती केली होती. आता आमिरचा (Aamir Khan) मुलगा जुनैदही मोठ्या पडद्यावर दिसणार असून त्याला मात्र बॉलिवूडमध्ये मोठे नाव असलेल्या यशराज बॅनरमध्ये पहिलाच सिनेमा करण्याची संधी मिळाली आहे. यशराज बॅनरमध्ये (Yashraj Banner) एकदा तरी काम करण्याची संधी मिळावी असे स्वप्न अनेक कलाकार वर्षानुवषे पाहात असतात पण त्यापैकी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या कलाकारांचेही स्वप्न साकार होत नाही.

15 फेब्रुवारीचा मुहुर्त जुनैदने बॉलिवूडमधील प्रवेशासाठी निवडला. 15 फेब्रुवारी ही तारीख अमिताभ बच्चनला प्रचंड लकी ठरली आहे. अमिताभनेही 1969 च्या 15 फेब्रुवारीला त्याचा पहिला सिनेमा ‘सात हिंदुस्तानी’ साईन केला होता आणि आता जुनैदने याच दिवशी त्याच्या करिअरमधील पहिल्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. जुनैद यशराजचा सिनेमा करणार असल्याची बातमी आम्हीच तुम्हाला सर्वप्रथम दिली होती. यशराजच्या जुनैद अभिनीत या सिनेमाचे नाव ‘महाराजा’ ठेवण्यात आले असून याचे दिग्दर्शन ‘वुई आर फॅमिली’ आणि ‘हिचकी’चे दिग्दर्शन करणारा सिद्धार्थ पी मल्होत्रा करीत आहे. सोमवारी जुनैदने सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. अंधेरी पूर्व मरोळ येथे या सिनेमाच्या शूटिंगसाठी भव्य सेट लावण्यात आलेला आहे.

सिनेमात येण्यापूर्वी जुनैदने मोठ्या प्रमाणावर थिएटर केलेले आहे. या पहिल्या सिनेमासाठी तो गेल्या दीड वर्षापासून मेहनत घेत होता. ‘महाराजा’चे कथानक1862 मधील आहे. जदुनाथजी ब्रजरतनजी महाराज नावाच्या एका धार्मिक प्रचारकाने एक पत्रकार करसनदास मुलजी याच्या लेखाविरोधात न्यायालयात खटला दाखल केलेला असतो. यात जुनैद त्या पत्रकाराची भूमिका साकारीत आहे. यशराजने अजून अधिकृतरित्या या सिनेमाची आणि जुनैदच्या नावाची घोषणा केलेली नसली तरी याचे शूटिंग मात्र युद्ध स्तरावर सुरु करण्यात आले आहे. सिनेमात जुनैदसोबत शालिनी पांडे नायिकेच्या रुपात दिसणार आहे. सोबत शर्वरी वाघही दिसणार आहे. जुनैदच्या रुपाने हुसैन परिवाराची तिसरी पिढी रुपेरी पडद्यावर आगमन करीत आहे. जुनैदला खूप खूप शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER