…म्हणून आमिर खान पुरस्कार सोहळ्याला जात नाही

आमिर खान (Amir Khan) कधीही कुठल्याही पुरस्कार सोहळ्याला जात नाही. एवढेच नव्हे तर आपल्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही तो कधी कुठल्या टीव्हीवरील कार्यक्रमात जात नाही. कपिल शर्माने (Kapil Sharma) आमिर खानला अनेक वेळा आपल्या शोमध्ये बोलावण्याचा प्रयत्न केला; परंतु आमिर खान कधीही त्याच्या सेटवर गेला नाही. कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूडमधील सगळे कलाकार आले; पण आमिर आला नाही आणि कपिलला याचे दुःखही आहे. आमिर स्वतःच्या चित्रपटाची  प्रसिद्धी कशी करायची, कोणाला मुलाखत द्यायची हे स्वतः ठरवतो आणि त्याप्रमाणे वागतो. देश-विदेशात आयोजित केल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यांना आमिरला आमंत्रण असते. त्याचे नामांकनही असते; पण तो कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला जात नाही आणि पुरस्कारही स्वीकारत नाही. पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचा निर्णय आमिरने २७-२८ वर्षांपूर्वीच घेतला आणि तो आजही त्यावर कायम आहे. त्याने असा निर्णय घेतला त्यासाठी कारणही तसेच घडले होते.

१९९२ मध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘खुदा गवाह’, अनिल कपूरचा ‘बेटा’ आणि आमिर खानचा ‘जो जीता वही सिकंदर’ असे चित्रपट प्रदर्शित झाले होते. तिन्ही चित्रपटांचा विषय आणि जॉनर वेगळा होता. ‘बेटा’ ही कौटुंबिक कथा होती तर ‘जो जीता वही सिकंदर’ कॉलेज जीवन आणि सायकलिंगवर आधारित होता. एका सिने मासिकाच्या पुरस्कारांच्या नामांकनामध्ये या तिन्ही चित्रपटांचे आणि या तिन्ही नायकांचे नाव होते. आपला चित्रपट वेगळा असल्याने आणि आपली भूमिकाही वेगळी असल्याने आपल्याला पुरस्कार मिळेल, असे आमिर खानला वाटत होते. परंतु बेस्ट ॲक्टर पुरस्कार आमिर खानला न देता अनिल कपूरला देण्यात आला. या गोष्टीमुळे आमिर खूप नाराज झाला आणि त्याचा पुरस्कारांवरचा विश्वास उडाला. आणि त्याने त्याच वेळी यापुढे कोणत्याही पुरस्कार समारोहाला न जाण्याचा निर्णय घेतला.

आता रोहित शेट्टी (Rohit Shetty) हृतीक रोशनसोबत बनवणार ॲक्शन कॅामेडी

रोहित शेट्टी हा सध्या बॉलिवूडमधील अत्यंत यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने ॲक्शन, कॉमेडी जॉनरचे चित्रपट दिले आणि ते यशस्वीही झाले. अजय देवगण  आणि रोहितचे खूपच चांगले जमते. तरीही रोहितने शाहरुख खानसोबत ‘चेन्नई एक्सप्रेस’ केला. हा चित्रपटही प्रचंड यशस्वी झाला होता. त्यानंतर त्याने ‘सिंघम’ला ‘सिंबा’चे रूप दिले आणि रणवीर सिंहसोबत काम केले. हा चित्रपटही प्रचंड यशस्वी ठरला. त्यानंतर रोहितने अक्षयकुमारशी हातमिळवणी केली आणि ‘सूर्यवंशी’ची निर्मिती केली. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट अजून प्रदर्शित होऊ शकला नाही. लवकरच तो  प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टीच्या युनिटमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितने हृतीक रोशनबरोबर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला असून हा एक ॲक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे. रोहितने हृतीकला  कथा ऐकवली असून त्यालाही ती  खूप आवडली आहे.  हृतीक   सध्या ‘क्रिश-४’ मध्ये व्यस्त असल्याने  ते शूटिंग पूर्ण झाल्यानंतरच तो रोहितचा चित्रपट करणार आहे. यासोबतच यशराजही हृतीकसोबत ‘वॉर-२’ ची योजना आखत आहे.

अर्थात रोहितही ‘गोलमाल-५’, ‘सिंघम-३’ च्या तयारीत आहे. त्यानंतरच  हृतीकसोबतच्या चित्रपटाला सुरुवात केली जाणार आहे. अजयव्यतिरिक्त रोहितने ज्या नायकांना घेतले त्यांच्यासोबतचे त्याचे चित्रपट हिट झाले आहेत. त्याच्या या यादीत आता हृतीक  रोशनचेही नाव समाविष्ट होत असून ही जोडी बॉक्स ऑफिसवर प्रचंड करामत करेल यात शंका नाही.

सुशांतला करायचे होते हॉलिवूडमध्ये काम

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा उलगडा पुढील आठवड्यात होणारच आहे. त्याच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये नेपोटिझम आणि ड्रग्जच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी याचा तपास सुरू केला असून दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्येचा तपासही सुरू आहे. पोलिसांना सुशांतची डायरी सापडली असून त्यात त्याने हॉलिवूडचा चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली असून सिगरेट सोडण्याचा विचार करीत असल्याचेही लिहून ठेवल्याचे समजते. २०१८ मध्ये सुशांतने त्याच्या पावना फार्म हाऊसमध्ये हॉलिवूड आणि सिगरेट सोडण्याबाबतचा निर्णय त्याच्या डायरीत लिहिल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय सुशांतने कैलास मानससरोवर येथे जाण्याची, योगा, तपस्या आणि तिसऱ्या डोळ्याचाही उल्लेख त्याने डायरीत केला आहे. त्याने आपली दिनचर्याही डायरीत लिहिली असून त्यात तो रात्री अडीच वाजता उठतो, त्यानंतर चहा पितो, थंड पाण्याने आंघोळ करतो असा उल्लेख आहे. डायरीच्या एका पानावर त्याने टेनिस, तिरंदाजीसाठी वेळ निश्चित केल्याचेही लिहिलेले आढळून आले. ही सगळी कामे चार तासांत कशी करायची याचे नियोजन त्याने डायरीत केलेले आहे. तसेच त्याने डायरीत कीर्ती  सोननसोबत वेळ घालवण्याचा उल्लेख केला असून बहीण  प्रियंका आणि तिचा पती महेशसोबत टूरवर जाण्याची इच्छा असल्याचेही लिहिलेले आहे. एकूणच सुशांतने करिअरबाबत खूप प्लॅनिंग केल्याचेच या डायरीतून दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER