‘तांडव’ वादामुळे आमिरने बंद केली महाभारतावरील वेब सीरीज

सैफ अली (Saif Ali Khan) अभिनीत ‘तांडव’ या वेबसीरीजमध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या वेबसीरीजविरोधात जनता आक्रमक झाली होती. मालिकेचे निर्माते, कलाकार आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर खटला दाखल करण्यात आला. निर्मात्यांनी वेबसीरीजमधून विवादास्पद सीन काढून टाकला आणि दिलगिरीही व्यक्त केली. एवढेच नव्हे तर काल म्हणजे मंगळवारी ओटीटी प्लॅटफॉर्मने या सर्व प्रकरणाबाबत लेखी माफी मागितली. या वादाच्या पार्श्वभूमीवर आमिर खानने (Aamir Khan) तो निर्माण करीत असलेल्या बहुचर्चित ‘महाभारत’ वेबसीरीज डब्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आमिर खानच्या डोक्यात ‘महाभारत’ विषय घेऊन सिनेमा बनवायचा विचार सुरु होता. पत्रकारांशी बोलताना आमिरने त्याच्या या महत्वाकांक्षी प्रोदेक्टबाबत माहितीही दिली होती. आमिरला महाभारतातील कर्ण’ ही व्यक्तिरेखा प्रचंड आवडते. संपूर्ण ‘महाभारत’ तो कर्णाच्या नजरेतून दाखवण्याचा विचार करीत होता. दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) द्रौपदीच्या रुपात दाखवण्याचा त्याचा मानस होता. बाहुबलीप्रमाणे दोन भागात हा सिनेमा आमिर तयार करू पाहात होता. मात्र हा सिनेमा आकार घेऊ शकला नाही. त्याच दरम्यान काही ओटीटी प्लॅटफॉर्मनी आमिरच्या या प्रोजेक्टमध्ये रुची दाखवली होती. त्यामुळे सिनेमाऐवजी काही भागांची भव्य मालिका तयार करण्याचा निर्णय आमिरने घेतला होता.

आमिर खान सध्या त्याच्या नव्या ‘लाल सिंह चड्ढा’च्या निर्मिती आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहे. या सिनेमानंतर कोणता सिनेमा करायचा याचाही निर्णय त्याने घेतला असून यानंतर तो लगेचच ‘महाभारत’ या त्याच्या महत्वाकांक्षी वेबसीरीजच्या निर्मितीला सुरुवात करणार होता. यासाठी एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत त्याचा करारही झाला होता असे सांगितले जाते. पण आता आमिर खानने महाभारताचा प्रोजेक्ट डब्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण ‘तांडव’वरून झालेला वाद आहे असे सांगितले जात आहे. महाभारत हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ही वेबसीरीज तयार करताना अनावधानाने काही वेडेवाकडे दाखवले गेले तर वेबसीरीजच्या कामावर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचा विपरीत परिणाम तर होईलच तसेच न्यायालयीन खटल्यांनाही सतत सामोरे जावे लागेल. यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे अधिकारी तयार नसल्याने आमिरने महाभारतावरील वेबसीरीज बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

त्यातच निर्माता वासु भगनानी (Vasu Bhagnani) यांनी नुकतीच कर्णाच्या जीवनावरील सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळेही आमिरने महाभारतावरील वेब सीरीजचा प्रोजेक्ट बंद केला असेही सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER