‘आज तक’ला २३ एप्रिल रोजी जाहीर माफी मागण्याचा आदेश

NBSA - Sushant Singh Rajput - Aaj Tak
  • सुशांत सिंगच्या खोट्या ट्विटच्या प्रसारणाचे प्रकरण

मुंबई :- दिवंगत बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याने प्रत्यक्षात न केलेली ट्विट ही त्याने मृत्यूपूर्वी केलेली शेवटची ट्विट  असल्याचे भासवून ती प्रसारित केल्याबद्दल ‘आज तक’ (Aaj Tak) या हिंदी वृत्तवाहिनीने येत्या २३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता त्यांच्याच माध्यमातून दर्शकांची जाहीर माफी मागावी, असा आदेश ‘ न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अ‍ॅथॉरिटी’ने (NBSA) दिला आहे.

खरे तर असे बनावट ट्विट  प्रसारित करून माध्यमांच्या व्यावसायिक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल ‘आज तक’ने गेल्या २७ ऑक्टोबर रोजी माफी मागावी, असा आदेश ‘एनबीएसए’ने ६ ऑक्टोबर रोजी दिला होता व त्यासोबत या वृत्तवाहिनीला एक लाख रुपये दंडही केला होता. परंतु ‘आज तक’ने तसे न करता त्या आदेशाच्या फेरविचारासाठी अर्ज केला. ‘एनबीएसए’ने हा फेरविचार अर्ज फेटाळला असून आता ‘आज तक’ला येत्या २३ एप्रिल रोजी जाहीर माफीनामा प्रसिद्ध करण्याचा नवा आदेश दिला आहे. हा माफीनामा टीव्हीच्या संपूर्ण पडदाभर दिसेल अशा मोठ्या अक्षरांत प्रसारित करायचा आहे. लेखी माफीनामा पडद्यावर दाखविला जात असताना तोच मजकूर संथ लयीत तोंडी स्वरूपातही प्रसारित करायचा आहे. आधी ठोठावलेला दंड ‘आज तक’ने जमा  केलेला नसल्याने तोही जमा करण्यास सांगण्यात आले आहे.

चित्रपट निर्माते निलेश नवलखा यांच्या तक्रारीवर ‘एनबीएसए’ने मूळ आदेश दिला होता. ‘आज तक’ने फेरविचार याचिकेत काही नवे मुद्दे मांडले व मुळात नवलखा यांची तक्रारच ग्राह्य नव्हती, असे प्रतिपादन केले. परंतु ते अमान्य करताना निवाडा मंडळाने म्हटले की, फेरविचार अर्जात नवे मुद्दे मांडता येणार नाहीत. ‘आज तक’ने आता जे नवे मुद्दे मांडले आहेत ते त्यांना आधीही उपलब्ध होते. परंतु तेव्हा त्यांनी ते  न मांडल्याने आता त्यांना ते मांडता येणार नाहीत.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button