“आई बाबा, तुम्ही भांडू नका ना प्लीज !”

Aai Baba Don't Argue

शुभमंगल सावधान! (Shubmangalam Savdhan) शब्द ऐकून अक्षता पडतात .सगळे आनंदित होतात. ती दोघे परस्परांना हार घालतात. दोन अगदी वेगवेगळ्या कुटुंबात वाढलेले जीव एकत्र येऊन पुढच्या सगळे आयुष्य व्यवस्थित एकमेकांबरोबर घालवतात किंवा निभावतात. कारण विवाह हा एक संस्कार आहे. संस्कारांमध्ये ‘कमिटमेंट ‘असते .तीच आपल्याकडील विवाहसंस्थेच्या मुळाशी आहे. सगळेच प्रेमविवाह किंवा परिचयोत्तर विवाह नसतात. असले तरी आधीचे ओळखणे आणि नेहमी सोबत राहणे यामध्ये खूप फरक असतो.

मुख्य म्हणजे भारतीय संस्कृतीत लग्न हे केवळ एका माणसाशी होत नाही तर, त्यामुळे पूर्ण कुटुंबियांशी नाते जुळत असते आणि शक्यतो नातं टिकवण्यावर ,विवाह टिकावण्यावरच भर असतो.

पण विवाह ही तसं म्हणाल, तर वैयक्तिक ,कौटुंबिक तितकीच सामाजिकही घटना आहे. आणि बाहेरची जागतिक, व्यावसायिक ,आर्थिक परिस्थिती खूप बदलली आहे. मग एकीकडे विवाह विषयक वैचारिक बदलांना नकार आणि दुसरीकडे समोरील परिस्थितीचा करावा लागणारा स्वीकार! याचा कोंडमारा होतो आहे. यातील बहुतांशी जास्त समस्या या निवडीबाबत वैचारिक स्पष्टता व योग्य मानसिक तयारी नसल्याने निर्माण झाल्या आहेत असे दिसून येते.

एके ठिकाणी डॉक्टर अनिल अवचट म्हणतात ,”विवाह या शब्दाला जोडशब्द कुठला विचाराल तर माझ्या मनात पटकन समस्या हा शब्द येतो. विवाह म्हटलं की आनंद हे समीकरण बदलत चालले आहे. इतकी ही समस्या मोठी होत चालली आहे .घटस्फोटाबाबत विदेश यांना हसता-हसता तो आपण आपल्या घरात अनुभवतोय. चांगल्या सहजीवनाची आस आपण का निर्माण नाही करू शकलो ?”

एकूणच दोघे पती-पत्नी यांच्यात अनेक कारणांनी वादविवाद होताना दिसतात . कारणे अनंत असणे हे अगदी स्वाभाविक आहे. दोन व्यक्ती इतक्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या या सगळी मते, आवडीनिवडी ,सवयी एकसारखे असूच शकत नाहीत .एक कंजूष तर दुसरा अति उदार! एक शांत अबोल, तर दुसरा प्रचंड उत्साही बडबडा !एकाला घरात बसायला आवडतं तर दुसऱ्याला फिरायला! अहो एवढेच काय ! एकाला फॅन चा वारा हवा असतो ,तर दुसऱ्याला नेमकी त्याचवेळी थंडी वाजत असते. यालाच म्हणतात ना 36 गुण जुळणे. अपोझिट पोल्स अत्त्रॅक्ट ! असे म्हणतात.

या ठिकाणी आपण बोलणार आहोत ते घरातल्या संघर्षाचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर स्वभावावर कसा परिणाम होतो त्याबद्दल ! कित्येक कुटुंबामधून आई-वडिलांचे होणारी टोकाची भांडणे, शिवीगाळ, मारहाण उघड्या डोळ्यांनी बघायची वेळ मुलांवर येते .अशावेळी मुले अगदी सशासारखी भेदरून एका कोपऱ्यात बसतात. त्यावेळी त्यांना पूर्ण असुरक्षित वाटतं. कुठेतरी उगीचच अपराधी भावना स्वतःबद्दल निर्माण होतो. मीच तर याला जबाबदार नाही ना ?असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो. दोघही आई आणि बाबा त्यांना तितकेच प्रिय असतात. त्यामुळे त्यांना दुःख होतं आणि त्याने ती एकटी एकटी राहू लागतात. अशी मुलं घरी प्रेम ,माया न मिळू शकल्याने बाहेर ओढली जातात, वाईट संगतीला लागू शकतात.

पालकत्वाची संकल्पना गुंतागुंतीची आणि विश्लेषण करायला अवघड आहे पालकत्व किंवा इंग्रजीमध्ये “टू पॅरेण्ट” हे एक सक्रिय क्रियापद असून त्याचा अर्थ पालकांनी त्यांच्या मुलांसाठी केलेल्या सकारात्मक कृती असा होतो .आणि जबाबदाऱ्या जसे की घडणाऱ्या स्थित्यंतरांसाठी, मुलांना समर्थ बनवणे, त्यांच्यातला स्व आदर भाव वाढवणे, कुटुंबाची मूल्ये मुलांवर ठसवणे आणि सकारात्मक शिस्त रुजवणे या महत्त्वाच्या भूमिका कराव्या लागतात.

पालकांना वादविवादाच्या वेळी हे सगळं कळतं पण वळत नाही .त्यात इगो,माघार कोण घेईल हा प्रश्न असतो ,दुर्लक्ष करणे जमत नाही. शब्दाला शब्द वाढत जातो आणि वाद वाढतो त्यातून घरात मानसिक आजार किंवा व्यसन असेल तर मुलांची स्थिती बरेचदा दयनीय होते.

अशावेळी केवळ मुलांसाठी एकदा शांत डोक्यांनी दोघांनीही मूळ प्रॉब्लेम काय आहे ?म्हणजे मानसिक आजार आहे का? त्यामुळे रागावर कंट्रोल रहात नाही का? की. घरातील व्यसन हे चिडचिडेपणाचे कारण आहे? याचा विचार करून दोषारोप न करता ट्रीटमेण्ट सुरू करावी. दुसरी गोष्ट भांडणाचे काही नियम तयार करावे. एक आहे की भांडणाची कारणे नाहीशी करणे किंवा स्वभाव बदलणे शक्य नसते पण त्यावर विचार करायचा आहे. एवढा तरी विचार मनात पक्का करावा.

मुलांसमोर भांडणे वादविवाद होऊ देऊ नये चारचौघांच्या देखातही नको. भांडणाची वेळ ठरवून घ्या भांडण फक्त अर्धा तासच करायचं ज्या मुद्द्यावर भांडण सुरू झालं त्याच मुद्द्यावर संपवायचं नाहीतर तुझे माझे आई-वडील आणि त्यांचे संस्कार यावर जाऊन जखमांवर च्या खपल्या उडतात व जखम चिघळते संपल्यानंतर लगेच काही झालं होतं की नाही असा स्वीच ऑफ करून कामाला लागा एकमेकांसमोर राहिलं तर उगीच वाद वाढत जातात.

मुलांना तुम्ही जन्म दिला असतो. त्यात त्यांची काही चूक नसते .त्यांना त्रास देण्याचा आपल्याला पालक म्हणून काहीही अधिकार नसतो. त्यामुळे परस्परांविषयी कटुता त्यांच्या मनात ओतण आणि इमोशनल ब्लॅकमेलिंग साठी त्यांचा वापर करणे योग्यच नव्हे.उलट करता आला तर परस्परांविषयी आदरच निर्माण करा त्यांच्या मनात! काही गोष्टी सोडून द्या. एकमेकांच्या स्पेसमध्ये नाकं खुपासण सोडा. “तुझा नि माझा एकपणा” वगैरे एका मर्यादेपर्यंत! नंतर दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. दोघांनाही आपली आपली काम आहेत .आणि मुलं ही दोघांची जबाबदारी आहे हे ओळखलं तर “आई बाबा तुम्ही भांडू नका ना प्लीज !”अशी गयावया करण्याची वेळ मुलांवर येणार नाही.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER