आघाडी सरकारकारकडून नागपूर महापालिका बरखास्त करण्याच्या हालचाली?

Nagpur Municipal Corporation

नागपूर : गेल्या तीन टर्मपासून भाजपाच्या ताब्यात असलेली नागपूर महापालिका येत्या काळात बरखास्त करण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारकडून सुरू झाल्या आहेत. यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचा आधार घेतला जाणार असून सोबतच विविध प्रकल्पांच्या कामात झालेली अर्थिक अनियिमतता शोधून त्या रेकॉर्डवर आणण्याच्या छुप्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

१३ वर्षांपासून महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. सद्यस्थितीत भाजपाचे १०८ नगरसेवक असून महाविकास अघाडीतील काँग्रेसचे २९, शिवसेनेचे दोन व राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक आहे. राज्यातील भाजपाची सत्ता आपल्या हातात घेतल्यानंतर आता महापालिकेतून भाजपाला हद्दपार करायचे असेल तर महापालिकेलाच लक्ष्य करावे लागेल, असा आग्रह महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला आहे.

तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेतील रस्ते बांधकाम घोटाळा उघडकीस आणत शिवसेनेची नाकाबंदी केली होती. याचे उट्टे काढण्यासाठी त्याच धर्तीवर नागपूर महापालिकेची २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, सिमेंट रोड प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात फसवून भाजपला घेरण्याची रणणिती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, याची प्रचित कालच दिसून आली. महापालिकेच्या इतिहासात पहील्यांदा नवा इतिहास घडला! आयुक्तांच्या भेटीला शिष्टमंडळाच्या ऐवजी संपूर्ण सत्ता पक्षच महापालिकेत पोहोचला. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता सत्तापक्ष आयुक्तांच्या भेटीला गेला असता आयुक्तांनी आधी दहा मिनिटांचा अवधी सत्ता पक्षाला दिला होता यांनतर त्यांनी पंधरा मिनिटांचा अवधी केला. यावरच आक्षेप नोंदवित सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव यांनी आयुक्तांना धारेवर धरले. सत्ता पक्षाचे १०८ सदस्य असताना फक्त पंधरा मिनिटात बोलणे होणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.