
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या सर्व घटनांमागील घटनांचा उलगडा करणारं ‘चेकमेट’ हे पुस्तक पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलं आहे. या पुस्तकातच मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे कसं आलं, याविषयीचा उलगडा करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपापासून दूर झाली. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असं राजकीय समीकरण मूळ धरू लागलं होतं. ‘११ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वांद्रेतील ताज लँडस् अँड हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे व दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित होते. त्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याबद्दल चर्चा झाली. हे सरकार स्थापन होईल याबद्दल शरद पवारांना खात्री होती. पण, त्यांच्या मनात मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल विचार सुरू होता. ’ असे पुस्तकात म्हटले आहे .
ही बैठक संपल्यानंतर शरद पवार सरकत्या जिन्यानं खाली उतरत होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांना ‘आपण एकत्र येऊन सरकार स्थापन करत आहोत, हे सर्व ठीक आहे. पण, नेता कोण असेल? मुख्यमंत्री कोण असणार? काही नावं मी ऐकली आहेत, पण ती नावं स्वीकारता येण्यासारखी नाही. सरकारचं नेतृत्व करायला आदित्य ठाकरे खूप लहान आहेत. अजित पवार व इतर वरिष्ठ नेते त्याच्या नेतृत्वाखाली काम नाही करू शकत. एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावं आमच्याकडे स्वीकारली जाणार नाहीत.
’ असे सांगत पवार यांनी संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांचे नाव सुचविले . त्याच क्षणी संजय राऊत उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे बसलेल्या रूममध्ये पोहचले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं की, “शरद पवार सरकार स्थापन करण्यास तयार आहेत, पण त्यांचा प्रश्न मुख्यमंत्रिपदाबद्दल आहे. सध्या मुख्यमंत्रिपदासाठी जी नावं चर्चेत आहेत, ती त्यांना मान्य नाहीत.
त्यांची इच्छा आहे की, तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं. ” असे राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकले . त्यानंतर उद्धव ठाकरे थोडं अवघडत बोलले की, “मी कोणत्याही सरकारमध्ये नव्हतो.” त्यावर राऊत म्हणाले,”जर तुमची इच्छा असेल की, मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, तर तुम्हाला स्वतःला तयार करावं लागेल, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पाठिंबा देणार नाही. ” असे राऊत यांनी सांगून टाकले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला