राज्यातील ६५ लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नाही

मुंबई : विद्यार्थ्यांना विविध योजनांद्वारे लाभ दिला जातो. या योजना गरजू आणि योग्य लाभार्थ्यांना मिळाव्यात, त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये, याकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंद ‘सरल’ प्रणालीद्वारे घेतली जात आहे. मात्र, राज्यातील तब्बल ६४ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची (Aadhaar cards) अद्याप नोंद झालेली नाही. ही नोंद मार्च २०२१ पूर्वी करावी, असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शालेय पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजना आदींसह इतर योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी लाभ देण्यात येणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची माहिती राज्य शासनाच्या ‘सरल’ प्रणालीद्वारे संकलित केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड क्रमांकांची नोंद केली जाते. यामुळे दुबार अथवा अस्तित्वात नसलेले लाभार्थी शोधणे शक्य होत आहे.

या ‘सरल’ प्रणालीत एकाच आधार कार्डवर नावात साधर्म्य असलेल्या विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. अस्तित्वात नसलेले आधार कार्ड क्रमांकही नोंदवण्यात आलेले आहेत. यामुळे योजनांवर परिणाम होऊन पात्र लाभार्थी वंचित राहण्याचा तसेच यामध्ये गैरप्रकार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली नाही. ते योजनांच्या लाभापासून लांब राहण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER