कोरोना, लॉकडाऊन, अनलॉक आणि बॉलिवूडचे एक वर्ष

बरोबर एक वर्षापूर्वी याच तारखेला भारतात कोरोनामुळे (Corona) लॉकडाऊनची (Lockdown) स्थिती निर्माण झाली होती. एक दिवसाचा जनता कर्फ्यू (Public curfew) लागू केल्यानंतर लगेचच म्हणजे दोनच दिवसांनी भारतात १४ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला. हा लॉकडाऊन जवळ-जवळ सहा महिने सुरू होता. त्यानंतर हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे घरात बसलेल्यांना थोडासा दिलासा मिळू लागला. वर्क फ्रॉम होमसोबतच काही ऑफिसेसमध्ये ५० टक्के उपस्थितीही सुरू करण्यात आली. बॉलिवूड (Bollywood) म्हणजे २४ तास काम करणारे क्षेत्र. लॉकडाऊनमुळे हे क्षेत्र संपूर्ण ठप्प पडले होते. असे असले तरी या एक वर्षात बॉलिवूडने खूप काही केले. काही कलाकारांनी सामाजिक जाणिवा लक्षात ठेवून  मदतीचा ओघ सुरू केला तर काही जणांनी घरबसल्या शॉर्ट फिल्म तयार केल्या. तर काही जणांनी पुढील सिनेमासाठी स्क्रिप्ट वाचून काढल्या.

तर काही जणांनी फार्म हाऊसवर शेती करण्यात वेळ घालवला. या एक वर्षात बॉलिवूडने नक्की काय केले ते आपण पाहूया- लॉकडाऊन लागल्यामुळे बॉलिवूडचे काम पूर्णपणे बंद झाले होते. त्यामुळे सलमान खानने त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर जाऊन आराम करण्याचे ठरवले. मात्र तेथे गेल्यानंतरही तो गप्प बसला नाही. त्याने तेथेच स्वतःचे यूट्यूब चॅनल लाँच केले. एवढेच नव्हे तर त्याने स्वतःचे तीन म्युझिक व्हिडीओ  रिलीज केले. एवढे करून तो गप्प बसला नाही तर त्याने सॅनिटायझरची वाढती मागणी पाहून फ्रेश नावाने एक कंपनीही स्थापन केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून सॅनिटायझरच्या बाजारातही प्रवेश केला. गायक मिका सिंहने लॉकडाऊनच्या काळात दोन म्युझिक व्हिडीओ  घरातूनच तयार केले. यातील ‘क्वारंटाइन लव्ह’ हे गाणे चाहत खन्नावर चित्रित करण्यात आले तर दुसरे गीत ‘तुम जो मिल गए हो’ नताशा सूरी आणि प्रिया बॅनर्जीवर चित्रित करण्यात आले. अभिनेता वत्सल शेठने लॉकडाऊनच्या काळात ‘कहा तो था’ ही शॉर्ट फिल्म तयार केली. ही शॉर्ट फिल्म वत्सल आणि त्याची पत्नी ईशा दत्तावर शूट करण्यात आली होती. अभिनेता, अँकर आणि होस्ट मनीष पॉलनेही लॉकडाऊनवर आधारित एक शॉर्ट फिल्म ‘व्हाट इफ’ तयार केली. या शॉर्ट फिल्मची अमिताभ बच्चनसह अनेकांनी प्रशंसा केली. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडता येत नसल्याने कलाकारांनी व्हर्च्युअल जगाचा वापर करण्यास सुरुवात केली.

अमिताभ बच्चन यांनी ‘केबीसी’च्या नव्या सीझनचा प्रोमो घरातच शूट केला. एवढेच नव्हे तर शोच्या रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक प्रश्नांचे शूटिंगही घरातच करून प्रोडक्शन कंपनीला दिले होते. अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही रियालिटी शो ‘डांस दीवाने’चा पहिला प्रोमो घरातच शूट केला होता. मनीष पॉलनेही एका ई-कॉमर्स कंपनीसाठी ‘क्या बोलती पब्लिक’ हा गेम शो व्हर्च्युअलीच होस्ट केला होता. लॉकडाऊन काळात गोरगरिबांचे, श्रमिकांचे खूप हाल झाले. तेव्हा अभिनेता सोनू सूदने श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत सुरू  केली. त्याने देशभरातील विविध राज्यांतील श्रमिकांना त्यांच्या त्यांच्या राज्यातील घरी जाण्यास बस, रेल्वे आणि विमानाची सोय करून दिली. सोनूचे गरिबांना मदत करण्याचे काम अजूनही सुरू आहे. अमिताभ बच्चन यांनीही जवळ जवळ हजारेक श्रमिकांना त्यांच्या घरी परत जाण्यास मदत केली होती. दुसरीकडे अक्षयकुमारने कोरोनाच्या लढाईसाठी पीएम केयर्स फंडात २५ कोटी रुपयांची मदत केली.

याशिवाय मुंबई महानगरपालिकेला मास्क, पीपीई किट आणि रॅपिड फायर किट्स खरेदी करण्यासाठी २५ लाखांची मदत केली. शाहरुख खान, सलमान खान, ऋतिक रोशन, शाहिद कपूर यांनीही बॉलिवूडमधील बॅक स्टेज आर्टिस्ट आणि सामान्य जनतेला मदत केली होती. बॉलिवूडमधील बहुतेक सगळ्या कलाकारांचे आलिशान, भव्य असे फार्म हाऊस आहेत. या लॉकडाऊनच्या काळात सलमान खानपासून धर्मेंद्र, नवाजुद्दीन सिद्दीकी, साउथ सुपरस्टार प्रकाश राज यांनी लॉकडाऊनचा बराचसा वेळ त्यांच्या फार्म हाऊसमध्ये शेती करण्यात घालवला. सलमान आणि धर्मेंद्रने शेती करतानाचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले होते.

तर दुसरीकडे काही कलाकारांनी स्वतःला फिट ठेवण्यासाठी घरी राहूनच जिम करण्यास सुरुवात केली. अनेक कलाकारांनी या काळात स्वतःचे वजन बऱ्यापैकी कमी केले तर काही कलाकारांनी व्यायाम करून शरीर कमावले. यात फरदीन खान, कश्मीरा शाह, कपिल शर्मा यांनी वजन कमी केले तर धर्मेंद्र, सलमान खान, अनिल कपूर, कॅटरीना कैफ, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, शिल्पा शेट्टी, विद्युत जामवाल यांनी घरीच व्यायाम आणि योगा करून स्वतःला फिट ठेवले आणि शरीरही कमावले. या कलाकारांनाही सोशल मीडियावर त्यांच्या व्यायामाचे आणि योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. एकूणच गरिबांना घरात काय करावे असा प्रश्न पडला असताना या एक वर्षात बॉलिवूडने भरपूर काही केल्याचेच या उदाहरणांवरून दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER