एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही आघाडीचे सरकार आले व टिकले – शिवसेना

CM Uddhav Thackeray - Devendra Fadnavis - Ajit Pawar

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते सातत्याने ठाकरे सरकारडे ‘लव्ह जिहाद‘बाबत कायदा करण्याची मागणी करत आहे. तसेच लव्ह जिहाद कायद्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने भाजपचे पुढारी शिवसेनेवर (Shiv Sena) हिंदुत्वविरोधी अशी टीका करत आहेत. यावर आता शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्राद्वारे उत्तर दिले आहे. अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरु शकली नाही. आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे.

आजचा सामनातील अग्रलेख…

आधी लव्ह जिहादची (Love Jihad) कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल. ही व्याख्या योगीजी किंवा शिवराजमामांनी ठरवली व देशाने स्वीकारली असे होणार नाही. बिहारात भाजपचे राज्य आहे व नितीश कुमार (Nitish Kumar) मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव्ह जिहादविरोधी कायदा भाजप करणार असेल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या! काय हो, महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनो, हे बरोबर आहे ना? ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे, अशी खोचक टीकाही शिवसेनेने भाजपवर केली आहे.

लव्ह जिहादवरून सध्या भाजपने आदळआपट सुरू केली आहे. हिंदू मुलींना मुसलमान तरुण फूस लावून पळवून नेतात. त्यांचे धर्मांतरण करून निकाह लावतात. हा हिंदुत्वावर आघात आहे. त्यास ‘लव्ह जिहाद’ असे नाव देण्यात आले. पाकिस्तान, चीनची घुसखोरी, रोज होणारे जवानांचे बलिदान, कोरोनाचे दुसऱया महायुद्धाप्रमाणे उसळलेले संकट, त्यातून निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट हे प्रश्न तसे गंभीर नसून ‘लव्ह जिहाद’ हेच देशासमोरचे सगळय़ात भयंकर संकट आहे व महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्यांप्रमाणे ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी भाजप पुढाऱ्यांनी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शर्मा यांनी मुंबईत येऊन राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे वाढत आहेत. त्याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी चिंता व्यक्त करावी हे अनाकलनीय आहे. भाजपने ‘लव्ह जिहाद’ची जी व्याख्या ठरवली आहे त्यानुसार महाराष्ट्रात अशी प्रकरणे कधी व किती घडली आहेत, ते समोर आणावे, पण उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. भाजपला हिंदुत्वाचा घोर लागून राहिला आहे. लव्ह जिहाद हे त्यांचे नवीन हत्यार आहे. प. बंगाल निवडणुकांनंतर ते हत्यारही भंगारात जाईल. लव्ह जिहादचे प्रकार कुठे सुरू असतील तर ते पाकिस्तान आणि बांगलादेशात. पाकिस्तानातील हिंदू समाजातील महिला, मुली अत्यंत असुरक्षित जिणे जगत आहेत. त्यांना पळवून नेले जाते. त्यांचेही जबरदस्तीने धर्मांतरण करून निकाह लावले जातात. विरोध करणाऱ्या मुलींना ठार केले जाते. त्याच दहशतीखाली अनेक हिंदू कुटुंबे पाकिस्तानातून पळून हिंदुस्थानात आश्रयास आली आहेत. बांगलादेशातही वेगळे काही सुरू नाही. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात शस्त्र उचलण्याची गरज तेथे आहे. अर्थात त्या परक्या प्रदेशात जाऊन भाजप किंवा संघ परिवारास आंदोलन वगैरे करता येणार नाही. पण केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी पाकिस्तान, बांगलादेश सरकारला दम नक्कीच भरता येईल.

एखादा सर्जिकल स्ट्राइकही करता येईल. लव्ह जिहादची मुळे पाकिस्तानात आहेत व आता मुळावरच घाव घातल्याशिवाय पर्याय नाही, हे समजून घेतले पाहिजे. ‘लव्ह जिहाद’चे कंबरडे मोडायचेच असेल तर मुळावर म्हणजे पाकिस्तानवर घाव घाला. म्हणजे हिंदुस्थानातील राज्याराज्यांत यावर आंदोलने, कायदे वगैरे करण्याची वेळ येणार नाही. आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरयाणा या भाजपशासित राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण कायद्यापेक्षा या प्रश्नी बोंबलण्याचीच उकळ जास्त फुटली आहे. या उकळीचे कढ महाराष्ट्रात आले नसते तरच नवल होते. महाराष्ट्रात लव्ह जिहादविरुद्ध कायदा कधी करणार? हे सरकार हिंदुत्वविरोधी आहे, असे उकाळे यानिमित्त फुटत आहेत. लव्ह जिहाद हा विषय शिवरायांच्या महाराष्ट्रात रुजू शकत नाही. दुसरे असे की, येथे शिवसेनेचा हिंदुत्ववाद कायम आहे. पण आमचे हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धार्मिक उन्माद व त्यावर तरारलेले राजकारण नाही. लव्ह जिहाद म्हणजे फक्त दोन भिन्न धर्मीयांनी एकमेकांशी निकाह लावणे इथपर्यंतच मर्यादित आहे काय? खरे सांगायचे तर वैचारिक ‘लव्ह जिहाद’मुळे देशाचे व हिंदुत्वाचे सगळय़ात जास्त नुकसान झाले आहे. कश्मिरात पाकनिष्ठ, 370 कलमप्रेमी मेहबुबा मुफ्तींशी भाजपने सत्तेचा निकाह लावला हासुद्धा वैचारिक लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये? संघमुक्त, मोदीमुक्त हिंदुस्थान असा डंका पिटणाऱ्या नितीश कुमारांना पुन्हा कडेवर घेऊन सत्तेचा निकाह लावला हासुद्धा लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये? हिंदुत्वाचे रक्षण सर्वच पातळ्यांवर होणे गरजेचे आहे.

फक्त ‘रोटी-बेटी’ व्यवहारापुरते व निवडणुकांपुरते ते नसावे. एका राज्यात गोमांस विक्रीला बंदी आणायची, गोमांस खाणे व बाळगणे हा कायद्याने गुन्हा ठरवायचा आणि त्याच वेळी गोवा किंवा ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांसाची खुली विक्री, व्यापार करायचे. ही अशी हिंदुत्व रक्षणाची प्रतारणा लव्ह जिहादच्या बाबतीत होऊ नये, हे महाराष्ट्र सरकारला ‘लव्ह जिहाद’बाबत प्रश्न विचारणाऱयांनी लक्षात घेतले पाहिजे. भारतीय जनता पक्षातील अनेक मंत्री व पुढाऱयांनी मुसलमान किंवा हिंदू मुलीशी लग्न केले आहे व त्यांचे संसार सुखाने सुरू आहेत. निर्भया, हाथरस प्रकरणी मुलींवर अत्याचार झाले. ते करणारे ‘लव्ह जिहाद’वाले नव्हते. या देशात एका समान नागरी कायद्याची गरज आहे व त्यात लग्नापासून मरणापर्यंत सगळय़ांना एकाच कायद्याच्या गाठीत बांधणे गरजेचे आहे. कुटुंब न्यायालयांत आज अनेक खटले ‘विभक्त’ होण्यासाठी तुंबले आहेत. यातील प्रकरणे ‘लव्ह’चीच जादा. ‘लव्ह जिहाद’चे विषय त्यात नाहीत. आता भाजपचे गृह राज्यमंत्री यांनी संसदेत सांगितले ते असे, ‘लव्ह जिहाद या संकल्पनेला कायद्यात कोणतेही स्थान नाही व आतापर्यंत कंद्रीय तपास यंत्रणांकडून एकही गुन्हा या प्रकरणी दाखल होऊ शकला नाही.’ हे कंद्राचे संसदेतले उत्तर याच वर्षातले आहे. असेही शिवसेनेने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER