आलियाला वाढदिवसानिमित्त ‘आरआरआर’च्या निर्मात्यांची अनोखी भेट

Maharashtra Today

अत्यंत कमी काळात स्वतःच्या अभिनयाच्या बळावर आलिया भट्टने (Alia Bhatt) बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नायिकाप्रधान सिनेमासाठी आलियाच्या नावाचा विचार केला जातो यातच तिचे यश आहे. म्हणूनच संजय लीला भंसाळीने (Sanjay Leela Bhansali) त्याच्या महत्वाकांक्षी ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमात गंगुबाईच्या भूमिकेसाठी आलियाला साईन केले. आलियाने ‘राजी’, ‘हायवे’ आणि ‘गली बॉय’मध्ये तिच्या अभिनयाची प्रतिभा दाखवली होती. केवळ बॉलिवूडच (Bollywood) नव्हे तर साऊथच्या सिनेमातही आलियाने धडक मारली असून तेथील अत्यंत भव्य आणि मल्टीस्टारर सिनेमात ती काम करीत आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी आज आलियाचा वाढदिवस असल्याने तिला अनोखी भेट दिली आहे.

महेश भट्टची मुलगी आलियाचा जन्म १५ मार्च १९९३ ला झाला होता. घरातच सिनेमाचे वातावरण असल्याने आलियाने लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. जमनाबाई शाळेत शिकलेल्या आलियाने बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या सहाव्या वर्षी अक्षय कुमार आणि प्रीती झिंटाच्या ‘संघर्ष’ सिनेमात प्रीतीच्या लहानपणीची भूमिका केली होती. त्यानंतर आलियाला प्रख्यात निर्माता दिग्दर्शक करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ सिनेमातून नायिकेच्या रुपात रुपेरी पडद्यावर आणले होते. त्यानंतर आलियाने मागे वळून पाहिले नाही. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियां’, ‘उड़ता पंजाब’, हे तिचे काही गाजलेले सिनेमे. २८ व्या वर्षात पदार्पण करीत असलेली आलिया सध्या कोट्यवधींची मालकीण आहे.

रणबीर कपूरबरोबर ती डेटिंग करीत असून हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. आलिया ‘आरआरआर’ या एसएस राजामौलीच्या तेलुगु सिनेमात काम करीत आहे. तिचा हा पहिलाच तेलुगु सिनेमा आहे. या सिनेमातील तिच्या कॅरेक्टरचे नाव सीता आहे. आज आलियाचा वाढदिवस असल्याने एसएस राजामौलीने सोशल मीडियावर तिचा सीतेच्या रुपातील फर्स्ट लुक जारी करून आलियाला वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे. या सिनेमात आलियाचा नायक रामचरण आहे. सिनेमात ज्यूनियर एनटीआर आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाची प्रचंड चर्चा असून पाच भाषांमध्ये हा सिनेमा तयार केला जाणार आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजे १३ ऑक्टोबर २०२१ ला हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER