मराठा आरक्षणासाठी तीन दिवसांचे संसदीय अधिवेशन घ्यावे, शिवसेना खासदाराची मागणी

Hemant Patil - Maratha Reservation

यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केल्यानंतर केंद्रातील महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. अशातच मराठा आरक्षणाला राज्यातील सर्व पक्षांनी एकमताने मंजुरी प्रदान केली आहे. मराठा आरक्षणाला कोणत्याही पक्षाचा विरोध दिसून येत नाही. आता या विषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी लोकसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी केली आहे. ते यवतमाळ येथे एका वृत्तपत्राशी बोलत होते.

ते म्हणाले, मराठा आरक्षणाला सर्वच पक्ष अनुकूल असून, कोणाचाही विरोध नाही. तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने आरक्षण देण्यात आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षण लागू करण्यात यावे. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत सर्व सदस्यांनी एकमताने ठराव पास केले आहेत. त्यामुळे लोकसभेत या विषयावर स्वतंत्र अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून योग्य ते प्रयत्न सुरू आहेत. राज्यात प्रामाणिकपणे चाचण्या होत आहेत. मात्र, राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न होत आहे. कोविड लस बनविण्याची क्षमता कंपन्यांकडे असताना जाणीवपूर्वक परवानग्या देण्यात टाळाटाळ केली गेली. यामुळे राज्यभरात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र इतर जिल्ह्यांच्या बाबतीत पुढे आहे. लसीकरणासाठी नागरिक तयार आहेत. मात्र, लशींचा पुरवठा होत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी जिल्हा विकास निधीतील ३० टक्के रक्कम राखीव ठेवण्याचा जो निर्णय राज्य शासनाने घेतला तो उत्तम आहे. तसेच शनिवारी झालेल्या बैठकीत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी केल्याचेही सांगितले. सध्याच्या रुग्णवाहिका २० वर्षे जुन्या आहेत. त्यावरील चालकांना पाच ते साडेपाच हजार रुपये वेतन मिळते. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार ११ ते १२ हजार वेतन देण्यात यावे, असे मत मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी एसडीआरएफ निधीतून नांदेड जिल्ह्यासाठी ५२, हिंगोलीसाठी २७ आणि यवतमाळसाठी ६३ रुग्णवाहिकांची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही खासदार पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button