
रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीकच्या निवळी येथे महिलेवर हल्ला केलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या टीमवर पिसाळलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात परिक्षेत्र अधिकारी प्रियांका लगड जखमी झाल्या. या कठीण परिस्थितीत वन विभागाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याची मान पकडून त्याला बाजूला केले.
निवळी बावनदी येथील शेल्टीवाडी येथील महिलेवर हल्ला करून बिबट्याने तिला जखमी केले होते. कामासाठी बाहेर गेलेल्या या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. यातून या महिलेने स्वतःला कसेबसे वाचवले. मात्र यात ती जबर जखमी झाली. याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर परिक्षेत्रीय अधिकारी प्रियांका लगड, राजेंद्र पाटील आणि सहकारी निवळी येथे तत्काळ रवाना झाले होते. दबा धरून बसलेल्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या बिबट्याने अचानक प्रियांका लगड यांच्यावर हल्ला केला.
यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. याचवेळी राजेंद्र पाटील यांनी प्रसंगावधान राखत श्रीमती लगड यांच्यावर हल्ला केलेल्या बिबट्याची मान पकडून त्याला बाजूला केले. जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम आणि अन्य ग्रामस्थ यांनीही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. यावेळी बिबट्याने चांगलीच झुंज दिली. यात बिबट्यासुद्धा जखमी झाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला