
लातूर : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. जिवंतपणी दोघांनीही आपल्या मैत्रीत कधीच अंतर पडू दिले नाही. मात्र मृत्यूनंतरही त्यांच्यात अंतर पडणार नाही कारण लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.
विलासराव देशमुख यांच्या स्मारक व संग्रहालयाला जागा देण्याचा एकतर्फी निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात उभा करण्यासाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
स्मारकासाठी जागा हस्तांतरण
जिल्हा परिषदेची ९ मार्च रोजी सर्वसाधारण सभा झाली. यात एकतर्फी निणर्य घेण्यात आला. विलासराव देशमुख यांच्या स्मारक व संग्रहालयासाठी लातूर पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने विनंती केली आहे. जिल्हा परिषदेत त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. विलासराव देशमुख यांच्या स्मारकाची इमारत लातूर पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानी उभारली जाईल आणि दक्षिण मराठवाड्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तेथे एक प्रांतीय सरकारचे कार्यालय उभारले जाईल.
विलासराव देशमुख लातूरचे, तर गोपीनाथ मुंडे बीडचे. त्याकाळी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना ‘दो हंसो का जोडा’ असे संबोधले जात होते. मैत्रीला अनुसरून या राजकीय मित्रांचे स्मारक एकमेकांच्या शेजारी उभारण्यात येणार आहेत.
वेगवेगळ्या पक्षात असूनही एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे सख्खे मित्र म्हणून ते परिचित होते. ग्रामपंचायतीपासून या दोघांच्या राजकारणाला सुरुवात झाली. पण दोघेही विद्यार्थीदशेपासून एकत्र होते. महाविद्यालयीन जीवनात देशमुख-मुंडे जोडीचे किस्से राजकारणात अजूनही ऐकायला मिळतात. दोघांचा अकाली निधन समर्थकांना धक्कादायक आहे.
देशमुख यांचा प्रदीर्घ प्रवास
सरपंच, आमदार, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास विलासराव देशमुख यांनी केला. अमोघ वक्तृत्व, हजरजबाबीपणा, अजातशत्रू नेतृत्व, प्रशासन हाताळण्याचे कौशल्य, महाराष्ट्राच्या राजकारणाची-समाजकारणाची नाडी अचूक ओळखण्याची क्षमता अशा त्यांच्या गुणांचा गौरव आजही केला जातो. त्यांचा राजकीय वारसा पुत्र आणि मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख चालवतात. १४ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.
मुंडें यांचे संघर्षमय जीवन
युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले. मनमिळाऊ स्वभावाचे, सर्वसामान्यांच्या गरजांची जाण असलेले ‘लोकनेते’ अशी त्यांची कीर्ती होती. ३ जून २०१४ रोजी दिल्लीत गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यांचा राजकीय वारसा कन्या आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे चालवतात.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला