नाणं तापवून दिला जायाचा कपाळावर डाग… भारतानंतर पाच वर्षांनी मुक्त झालेल्या विमुक्तांची संघर्ष कथा

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं. त्या १९३ जातींना स्वातंत्र्यानंतर ५ वर्ष १६ दिवसांनी मुक्ती मिळाली. ३१ ऑगस्ट १९५२ ला गुलामीच्या बेड्या उतरवणाऱ्या या जातींसाठी ३१ ऑगस्ट हाच स्वातंत्र्याचा, ‘विमुक्तीचा’ दिवस आहे. या जाती इतक्यावर्ष गुलाम राहण्यामागंच कारण म्हणजे स्वातंत्र्यासाठी वाटेल त्या थराला जावून संघर्ष करण्याची त्यांची तयारी. विमुक्त जातीच्या या लढवय्यांनी इंग्रजांनी भारतात पाय ठेवताच त्यांचा खरा इरादा हेरला आणि इंग्रजांविरुद्ध लढे सुरु केले.

भारतभर उठाव केले. ज्यावेळी स्वातंत्र्य नावाच्या संकल्पनेची कोणी चर्चा ही केली नसेल त्यावेळी या भटक्या जातींनी इंग्रजांशी दोन हात केले. सशस्त्र उठाव करणाऱ्या संघटनांना शस्त्र पोहचवण्याचं काम त्यांनी केलं. असचं सुरु राहिलं तर भारतातून आपला गाशा गुंडाळायला लागेल म्हणून इंग्रजांनी या बंडखोर जातींच्या मुस्क्या आवळण्यासाठी १८७१ ला काळा कायदा आणला.

क्रिमिनल ट्राइब अॅक्ट.

इंग्रजांनी १९३ जातींना गुन्हेगार घोषीत केलं मग त्यात कोणी गुन्हा केलाय की नाही याची चौकशी व्हायची, ना तपास व्हायचा, ना केस या जातीत जन्मलेल्या प्रत्येकालाचं गुन्हेगार मानलं जायचं. पुढं १९२४ ला कायदा अजून क्रुर झाला. १२ वर्षाच्या पोराची सुद्धा गुन्हेगार म्हणून ओळख पटावी यासाठी नाणं गरम करुन त्यांच्या कपाळावर डाग दिला जायचा. इतर लोकही त्यांच्याशी अस्पृश्यतेचा व्यवहार ठेवायचे. भारतावर इंग्रजांची सत्ता होती. खऱ्या अर्थानं ज्यांना गुलाम बनवलं गेलं त्या होत्या या भटक्या जाती. अगदी स्वातंत्र्यानंतरही त्यांना मुक्ती मिळाली नव्हती….

स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या या भटक्या जातींनी स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्य मिळालं नाही. त्याचं आयुष्य गुलामाचंच राहिलं. १९४९ ला क्रिमिनल ट्राइबच्या वैधतेच्या तपासणीसाठी आयोगाची स्थापना झाली.

या जातीतील लोकांना एका गावतून दुसऱ्या गावात जायचं झालं तर सरपंचाचा परवाना लागायला

त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला की प्रकरण कोर्टापर्यंत जायचं नाही, सुनावणी व्हायची नाही, बाजू ऐकली जायची नाही. पोलीस थेट शिक्षा द्यायचे. ३१ ऑगस्ट १९५२ ला हा काळा कायदा रद्द झाला तो दिवस भटक्या विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन म्हणून ओळखला जातो.

स्वातंत्र्याप्रमाण प्रत्येक बाबतीत आजही भटके विमुक्त मागेच आहेत. इतरांप्रमाणे त्यांना विकास साधता आलेला नाही. विकासच्या मुख्यप्रवाहात भटके विमुक्त आलेले नाही. राजकीय प्रतिनिधत्व नसल्यानं भटक्या विमुक्तांच्या हिताचे निर्णय झाले नाहीत.

भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी आजवर तीन आयोगांची नेमणूक झाली पण या आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झालेली नाही. केंद्र व राज्य सरकरांनी भटक्या विमुक्तांचं शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अनेक योजना राबवल्यात पण इच्छाशक्तीचा अभाव आणि भटक्या विमुक्तांच शैक्षणिक मागासलेपण त्यांना विकासाच्या मुख्यप्रवाहात न येण्यामागचा सर्वात मोठा अडसर आहे.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER