सईने गायले खास गाणे

Sai Lokur

लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मणीय आणि खास सोहळा असतो. मनासारखा जोडीदार मिळाल्यानंतर तर हा आनंद गगनात मावत नाही. खरं तर इतक्यात लग्नच करणार नाही आणि केलं तर होणारा नवरा मुंबईतच राहणारा हवा असं म्हणत कितीतरी प्रपोजल्सना नकार देणाऱ्या अभिनेत्री सई लोकूरची (Sai Lokur) लग्न गाठ तीर्थदीप रॉयसोबत ३० नोव्हेंबरला बांधली जाणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या साखरपुड्यापासून ते लग्नाआधीच्या भेटी, मैत्रिणीसोबत केलेली बॅचलर पार्टी, शॉपिंग याचे सगळे अपडेट सई तिच्या चाहत्यांना देतच असते. सईचं लग्न आता चार दिवसांवर आलं आहे. नुकतच तिच्या बेळगावच्या घरी केळवण झालं आणि त्यावेळी सजना है मुझे…सजना केलिए हे खास गाणं सईने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी अर्थात तीर्थदीपसाठी गायलं. तिच्या या व्हिडिओलाही फॅनपेजवर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

इंजिनीअर असून बेंगलोरमध्ये नोकरी करत असलेल्या तीर्थदीपला सई प्रेमाने दीप अशी हाक मारते. सईच्या बहिणीने हे नातं जुळवून आणलं. लग्न ठरल्यापासूनच सई खूपच खुश असल्याचं तिच्या सगळ्या पोस्टवरून दिसत आहे. लग्न ठरल्यानंतर लगेच तीर्थदीपसोबतचा पाठमोरा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत सईने मला जोडीदार मिळाला अशी ओळ लिहित उत्सुकता वाढवत ठेवली. त्यानंतर खास सईला भेटायला तीर्थदीप बेळगावला तिच्या घरी आला तेव्हाही तिने चाहत्यांशी लाइव्ह गप्पा मारल्या. गेल्याच आठवड्यात लग्नासाठी केलेलं प्रत्येक शॉपिंग सईने तिच्या चाहत्यांशी शेअर केलं आहे. आता तिच्या लग्नाला चार दिवसच उरले असल्याने तिच्या बेळगावच्या घरी खूपच लगीनघाई सुरू आहे.

ही बातमी पण वाचा : संस्कृती नटली आईच्या साडीत

लग्नघरी मुलीला केळवण केलं जातं. सईच्या घरीही दोन दिवसांपूर्वी हा सोहळा झाला. निळ्या रंगाच्या आणि केशरी काठाच्या साडीत सईचं सौंदर्य जास्तच खुलून आलं होतं. यावेळी आईबाबा, बहिण आणि जवळच्या नातेवाईक आणि जोडीला मैत्रीणी अशी धम्मालही होती. गेल्या महिनाभर सई खूप शॉपिंग करतेय. काही दिवसांपूर्वीच तिने खास लग्नासाठी कोणते नेलआर्ट करायचे हे ठरवण्यासाठी ब्युटीपार्लरलाही भेट दिली. त्यामुळे अगदी हेअरस्टाइलपासून ते पायाच्या नखांना कोणत्या रंगाचं नेलआर्ट करायचं याची खलबतं लोकूर यांच्या घरी सुरू आहेत.

सई सांगते, केळवणाच्या दिवशी मला तीर्थदीपसाठी एक गाणं गायचं होतं. लग्नासाठी मी जी तयारी करतेय ती तयारी मी सुंदर दिसावं म्हणून नाही तर दीप माझ्याकडे बघून आनंदी व्हावा यासाठी आहे. त्यामुळे हे सगळं त्याच्यासाठी सुरू आहे. हेच त्याला सांगण्यासाठी मला एक गाणं निवडायचं होतं. मग मी लग्नासाठी जी नटणार आहे ती त्याच्यासाठीच. त्यामुळे मग मी केळवणादिवशी सजना है मुझे सजना केलिए हे गाणं गायलं.

बिग बॉस मराठी या शोमुळे सई घराघरात पोहोचली. या शोमध्ये ती जिंकली नसली तरी बिग बॉसच्या घरातील अभिनेता आणि डान्सर पुष्कर जोगसोबतच्या तिच्या मैत्रीची चर्चा खूप रंगली होती. कॉमेडियन कपिल शर्मा याच्या किस किस को प्यार करू या हिंदी सिनेमातही सईने अभिनय केला होता. मिशन चॅम्पियन या सईच्या आई दिग्दर्शिका वीणा लोकूर यांच्याच सिनेमातून सईने अभिनयात पदार्पण केले. अभिनेत्री म्हणून तर सई सर्वांना माहितीच आहे पण खूप जणांना हे माहित आहे की सई एक उत्तम इंटिरिअर डिझायनर आहे. तसेच सईने पोहण्याचेही शिक्षण घेतले आहे. तिला मांजराची खूप आवड असून तिच्याकडे असलेल्या मोका नावाच्या मांजरात ती दर महिन्याला दणक्यात वाढदिवस साजरा करत असते.

सध्या तरी सई तिच्या लग्नाच्या तयारीत मग्न असून बेळगावची ही लेक लवकरच बेंगलोरची सून होणार असली तरी संसार मात्र तिच्या इच्छेप्रमाणे मुंबईतच थाटणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER