फिनटेकसाठी होणार विशेष महोत्सव

  • जगातील पहिले आयोजन मुंबईत
  • वित्त सेवांच्या डिजिटायझेशनवर भर

मुंबई : आर्थिक व्यवहारांच्या डिजिटायझेशनमुळे वित्त तंत्रज्ञान अर्थात ‘फिनटेक’ आधारित क्षेत्राला सध्या प्रचंड मागणी आहे. हे ध्यानात घेऊनच महाराष्ट्र सरकारने जगातील पहिला असा आंतरराष्ट्रीय फिनटेक महोत्सव मार्च २०२०मध्ये मुंबईत आयोजित केला आहे.

राज्य सरकारने गेल्यावर्षी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ गुंतवणूक परिषदेच्या निमित्ताने राज्यासाठी स्वतंत्र ‘फिनटेक’ धोरण आणले होते. त्यानंतर मुंबईत फिनटेक हब उभा होण्यास बळ मिळाले. परंतु आजही या क्षेत्रात अमर्याद वाव आहे. त्यासाठीच हा फिनटेक महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

फिनटेक धोरण आणल्यानंतर प्रामुख्याने लहान कंपन्याना बळ देण्याचे काम सरकार करीत आहे. त्याअंतर्गत या क्षेत्रातील अनेक लहान कंपन्यांसमोरील अडचणी दूर करून त्या या क्षेत्रात पाय रोवून उभ्या राहू शकतील, याचा प्रयत्न करण्यात आला. यातूनच राज्यातील द्वितीय श्रेणी शहरातदेखील अनेक स्टार्ट अप फिनटेकमध्ये समोर आल्याचे आढळले. त्यातूनच हा महोत्सव होत आहे.

राज्य सरकारच्या आयटी विभागाच्या सहकार्याने मुंबई फिनटेक हब व फिनटेक कन्व्हर्जनस कौन्सिलने हा महोत्सव आयोजित केला आहे. देशभरातील ५० हून अधिक देशांचे पाच हजारहून अधिक वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधी यात उपस्थित राहणार आहेत.

अॅप व यूपीआय आधारित आर्थिक व्यवहार जोमाने होत आहेत. यामुळेच या क्षेत्राला सेवा देण्यासाठी मुंबईत फिनटेक हब उभा राहिला आहे. या माध्यमातून ४०० कंपन्या आज कार्यरत आहेत.

दुसरीकडे, देशातील फिनटेक क्षेत्रात आतापर्यंत २०० कोटी डॉलरची गुंतवणूक झाली आहे. हा आकडा दुप्पट होण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. त्यामध्येही मुंबई आघाडीवर असेल. त्यादृष्टीने हा महोत्सव महत्त्वाचा असेल.