अमेयच्या डब्यातली खास डिश

Amey Wagh

एखादी व्यक्ती कितीही मोठी झाली आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असली तरी तिच्या आठवणीतला पदार्थ हा नेहमी खास असतो. मग तो कधी त्याच्या लहानपणाशी जोडलेला असतो तर कधी शाळेतल्या जेवणाच्या डब्याशी. अशीच एक आठवण अभिनेता अमेय वाघ याने त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केली आणि ती म्हणजे तूप साखर चपाती या ऑल टाइम फेवरेट पदार्थाची.

अमेय शाळेत असल्यापासून डब्यात न चुकता तूप-साखर चपातीचा रोल घेऊन जायचा. एकत्र जेवण्याचा प्रोग्राम संपला की मग त्याचे हे तूप साखर चपाती खाण्याचं स्वतंत्र संस्थान सुरू व्हायचं आणि तो त्यावर ताव मारायचा. ही झाली शाळेतल्या डब्या ची गोष्ट, मात्र आजही कुठेही जाताना जेव्हा तो डबा घेऊन जातो तेव्हा डब्यात कितीही पदार्थ असले तरी तूप-साखर लावलेली चपाती न्यायला तो विसरत नाही. शाळेत असताना अमेयची आई त्याला आठवणीने तूप साखर चपाती द्यायची पण आता त्याची बायको देखील त्याचे तूपसाखर चपातीचे लाड आनंदाने पुरवत असते.

सेलिब्रिटींच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी ऐेकायला त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. सेलिब्रिटी पडद्यावर जरी फिट दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक कलाकार हे खाण्यावर ताव मारत असतात. अर्थात त्यासाठी व्यायाम एक्सरसाइज डायट अशा गोष्टी देखील ते पाहत असतात. पण एखादा पदार्थ आवडत असेल तर त्यांना राहवत नाही हे मात्र नक्की. अमेय वाघ हा अभिनेता देखील याच पंक्तीतला आहे. खाण्यासाठी वाट्टेल ते हा त्याच्या जगण्याचा मंत्र असल्याचं तो नेहमी सांगतो. एका मुलाखतीच्या निमित्ताने अमेयने त्याच्या आवडीनिवडी शेअर केल्या.

अमेय सांगतो, लहानपणापासूनच घरात सगळ्या भाज्या खाण्याचा नियम होता. आईचा नियम असल्यामुळे त्याला पर्याय नव्हता. सहाजिकच मी लहानपणापासून सगळ्या प्रकारच्या भाज्या खात आलो आहे. आजही मला वांग्याची भाजी ,भोपळ्याची भाजी इतकी आवडते कि माझ्या वाढदिवशी माझी आवडती डिश म्हणून घरी वांग्याची, भोपळ्याची, कारल्याची या भाज्या आवर्जून केल्या जातात . वरण-भात हा तर माझा जीव की प्राण आहे. जर मला एक महिना दुसरा काही पदार्थ दिला नाही आणि मी नुसत्या वरण-भातावर ठेवलं तरीही मी आनंदाने जगू शकतो इतका मला वरण-भात प्रिय आहे. पण जेव्हा जेव्हा घरात किंवा माझ्या मित्रमंडळींमध्ये माझ्या मला काय खायला द्यायचं हा विषय निघतो तेव्हा अनेक जण माझ्यासाठी तूप साखर चपाती आणत असतात. शाळेत असताना माझ्या डब्यामध्ये साखर चपाती असते हे माझ्या मित्रांना कळालं तेव्हा ते माझा डबा चोरायला लागले. माझी तूप साखर चपाती खाल्ली म्हणून मी एका मित्राशी भांडण केलं होतं. कधी कधी असं वाटतं की आपल्या लहानपणीच्या आवडीनिवडी या आपण वयाने मोठे होऊ तशा मागे पडतात. पण अमेयच्या बाबतीमध्ये तूप साखर चपातीशी असलेलं नातं आजही तितकच गोड आहे.

अमेय वाघ (Amey Wagh) हा अभिनेता रंगभूमीच्या माध्यमातून पुढे आला. अनेक हौशी आणि प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत होता आणि त्यानंतर तो सिनेमा मालिका या माध्यमातही तितकाच यशस्वी झाला आहे. सँडअप कॉमेडीची नस अमेयला सापडली असून वेगवेगळ्या कोपरखळ्या करण्यात तो माहीर आहे. त्याच्या इन्स्टा पेजवर जे फोटो शेअर करत असतो त्या फोटोला दिल्या जाणाऱ्या कॅप्शनसुद्धा हसवणाऱ्या आणि हटके असतात. इतकेच नव्हे तर तो वेगवेगळ्या सणांच्या शुभेच्छा देखील विनोदी ढंगात देत असतो.

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तर फास्टर फेणे या सिनेमातला भन्नाट नायक छान निभावला होता. गर्लफ्रेंड सिनेमात सई ताम्हणकर सोबत त्याची जोडी त्याच्या त्यांना खूप आवडली होती .कोणतीही गोष्ट असो ती वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा त्याचा बाज आहे. सहाजिकच तूप साखर चपातीच्या निमित्ताने देखील त्याने त्याचे वेगळेपण जपलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER