एका अफवेने कहर केला : मृतदेह कचऱ्याच्या वाहनातून न्यावा लागला

Dead Body

सांगली : करोनाने इतकी दहशत निर्माण केली आहे की, प्रसंग सुखाचा असो किंवा दुखाचा असलातरी माणुस माणसाकडे शंकेने बघू लागला आहे. करोनाने माणुसकीही हिसकावून घेतल्यासारखी स्थिती झाली आहे. याचा प्रत्यय जतमधील एका घटनेने आणून दिला आहे. मृतदेह नेण्यासाठी एकही खासगी वाहन मिळू शकले नाही. त्यामुळे कचरागाडीतून नेऊन त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले.

जत मध्ये मृत्यू झालेल्या तरुणाला करोनाची लागण झाली होती, अशी अफवा सोशल मीडियावरुन व्हायरल झाला होता. नगरपालिककेकडे शववाहिकाच नसल्याने मृताच्या नातेवाईकांनी खासगी वाहन मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु अफवेमुळे एकही खासगी वाहन त्यांना मिळाले नाही. अखेर कचरा गाडीतून मृतदेह नेऊन त्यावर अंत्यसंसस्कार करावे लागले.

पर जिल्ह्यातून जतमध्ये संबधित तरुण 11 मे रोजी परतला होता. त्यानंतर 14 दिवसांसाठी त्याने घरातील अलगीकरण कक्षात रहावे असे प्रशासनाने सांगितले. परंतु त्या तरुणाला अस्वास्थ्य जाणवू लागल्याने त्याच्यावर जतमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला . त्याच्या मृत्यूनंतर जत शहरात तरुणाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याची जोरदार अफवा सोशल मीडियावर पसरली होती. जत शहर आणि नगरपालिका यंत्रणा हादरून गेली होती. मात्र या तरुणाचा मृत्यू हा अन्य कारणाने झाल्याचे समोर आले. मृत तरुणाच्या नातेवाईकांनी टाळेबंदीची परिस्थिती असल्याने जत नगरपालिका प्रशासनाला अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. प्रशासनाकडून सर्व त्या खबरदार्‍या घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. परंतु अंत्यसंस्काराच्या ठिकाणापर्यंत्त संबधित मृतदेह नगरपालिकेच्या एका कचरा घंटागाडीमधून नेण्यात आला. कचरा गाडीतून मृतदेह नेल्याचा व्हिडिओ समोर आल्याने जत शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित हाराळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित तरुणाचा मृत्यू हा करोनामुळे झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिका आणि तालुक्यात कोणाकडेही शववाहिका नसल्याने पालिका प्रशासनाने मृतदेह वाहून नेण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली होती. मात्र सहा तास उलटून गेल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहरातील अन्य वाहनातून मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाकडे कोणताच पर्याय नव्हता. कचरा घंटागाडीचे पूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले. मृतदेहाची कोणतीही विटंबना होणार नाही, याची खबरदारी घेऊन अंत्यसंस्काराची प्रकिया पार पाडली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER