बेडूक, साप आणि वाघाला एक विनंती…

Narayan Rane - CM Uddhav Thackeray Editorial

Shailendra Paranjapeदसऱ्याचा सण साजरा झाला. बाजारपेठात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेय आणि दिवाळीला हेच वातावरण टिकून राहील, अशी आशा आहे. दीपावलीच्या सणाला आशेचे दीप लागतील, कोरोनाचा अंधार दूर होत जाईल, हीदेखील आशा आहे.

दसऱ्यानंतर लगेचच गेले वर्षभर चंद्रपूरच्या अंधारी-ताडोबा व्याघ्र प्रकल्पातला नरभक्षक बनलेला वाघ पकडण्यात वन विभागाला यश आल्याची बातमी आलीय. या वाघानं १० जणांचा बळी घेतला होता आणि या वाघामुळं २२ गावांतल्या ग्रामस्थांना भीतीच्या सावटाखाली जगण्याची वेळ गेले वर्षभर आली होती. या ग्रामस्थांनी तर सुटकेचा नि:श्वास टाकला आहेच; पण त्याबरोबरच वन विभागानंही तो घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नरभक्षक वाघाला पकडण्यात यश आल्याबद्दल वन विभागाच्या संबंधित टीमचं अभिनंदन केलंय.

शिवसेना पक्षाचं आणि वाघाचं वास्तविक वेगळं नातं आहे. म्हणजे असं की वाघाला जेरबंद केल्याबद्दल एरवी ठाकरे आडनाव असलेली कोणीही व्यक्ती समाधान किंवा आनंद व्यक्त करणार नाही. पण उद्धव ठाकरे हे केवळ शिवसेना पक्षाचे सर्वोच्च नेते नाहीत तर ते राज्याचे मुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळं जनतेला त्रास देणारा वाघ जेरबंद केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय.

हा वाघ जेरबंद होण्याआधी शिवसेनेच्या नव्या पद्धतीतल्या आणि कोरोना (Corona) परिणामस्वरूप झालेल्या ऑनलाईन दसरा मेळाव्यावर सोशल मीडियामधे भरपूर उलटसुलट कौतुक-टीका झाली आहे. ती येथे उद्धृत करण्याचं काहीच प्रयोजन नाही; पण दसरा मेळाव्यात शिवसेना नेते या नात्यानं उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळून एका माजी शिवसैनिकाचा उल्लेख बेडूक असा केला.

हा बेडकाचा उल्लेख झाल्यानं आणि ही अप्रत्यक्ष आपल्यावरची टीका असल्यानं माजी मुख्यमंत्री, बाळासाहेबांचे शिवसैनिक, नंतरचे कॉंग्रेसचे मंत्री-नेते आणि आताचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. हिंदुत्व सोयीप्रमाणे वापरणारे ठाकरे हे दुतोंडी गांडूळ आहेत, असे शब्द राणे यांनी वापरलेत.

राजकारणात जनरली निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार-गैरप्रचारात एरवी प्राणिसंग्रहालयात पिंजऱ्यात बंद असलेले सारे प्राणी बाहेर येतात. काही चिन्हरूपाने तर काही टीकाटिप्पणी रूपाने. निवडणुकीच्या काळात केलेल्या भाषणांना नंतर फारशी किंमत दिली जात नाही; पण महाराष्ट्रात निवडणूक नसताना हा बेडूक, साप आणि वाघाचा शाब्दिक खेळ झाला. खेळानं लोकांची विशेषतः नेटकऱ्यांची, सोशल मीडियावरच्या बोटकऱ्यांची आणि रोजच्या रोज घराघरांत स्वतः निश्चल चित्र बनून टीव्हीच्या पडद्यावरची हलती चित्रं बघणाऱ्यांची थोडीफार करमणूक झाली.

आपण शिवसेनेत (Shiv Sena) असताना स्वर्गीय बाळासाहेबांनी आपल्याला वाघ होतो म्हणूनच मुख्यमंत्रिपद दिले होते, असंही राणे म्हणालेत. बाळासाहेबांची गोष्टच वेगळी होती. बाळासाहेबांकडे येऊन मदत मागणाऱ्या सुरेश कलमाडी यांची संभावना जाहीर सभेत मर्सिडीजमधून भीक मागायला आलेला बेडूक, अशी करणाऱ्या बाळासाहेबांचं टायमिंग आणि चपखल उदाहरणे द्यायची शैली इतकी लोकविलक्षण आणि एकमेकाद्वितीय होती की आताचा बेडूक, साप आणि वाघाचा खेळ म्हणजे केवळ शब्द बापुडे केवळ वारा, असंच वाटतं.

विजयादशमीला सीमोल्लंघन करतानाच राजकारण्यांनी आपल्या वर्तनातून व्यापक जनहितासाठी वाघासारखी कामगिरी करावी, हीच प्राणिसंग्रहालयातल्या समस्त दुबळ्या जीवांकडून प्रार्थना. कळावे. लोभ (तुम्हाला) आहेच, तो वाढवू नये हीच विनंती.

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER